Buldhana Bus Accident : मृतांमध्ये वर्ध्यातील 14 जणांचा समावेश | पुढारी

Buldhana Bus Accident : मृतांमध्ये वर्ध्यातील 14 जणांचा समावेश

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : Buldhana Bus Accident : सिंदखेडराजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला घडलेल्या अपघातग्रस्तांमध्ये वर्ध्यातून ट्रॅव्हल्समध्ये बसलेला 14 जणांचा समावेश आहे. अपघाताची वार्ता वर्ध्यात पोहोचली आणि सर्वांनाच धक्का बसला. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. भीषण अपघातामुळे समाजमन सुन्न झाले आहे. या अपघातात कुणाचा नोकरीसाठीचा, कुणाचा शिक्षणासाठीचा तर कुणाचा नातलगांकडे जाण्याचा हा प्रवास अखेरचा ठरला.

वर्धा येथील सावंगी (मेघे) येथील टी पॉइंट येथून वर्ध्याचे प्रवासी पुण्याला जाण्याकरिता विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये बसले. ट्रॅव्हल्सचा सावंगी येथून प्रवास सुरू झाला आणि नातलग घरी परतले. पहाटे ट्रॅव्हल्सला भीषण अपघात घडल्याची माहिती मिळताच नातलगांनी घटनास्थळाकडे वाहनांनी धाव घेतली. प्रत्येक जण प्रवास करत असलेल्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. ट्रॅव्हल्स एजन्सीधारक, प्रशासनासोबत संपर्क साधत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी बुलडाण्याकडे धाव घेतली. प्रशासनाकडून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले. ट्रॅव्हल्स एजन्सीतून प्रवाशांची नावे, संपर्क क्रमांक घेत नातलगांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी अपघाताची तातडीने माहिती घेतली. (Buldhana Bus Accident)

तिकीट नोंदणी करणार्‍या एजन्सीच्या कार्यालयात जात माहिती घेत संबंधित एजन्सीधारकासोबत संपर्क करून नावाची खातरजमा करण्यात येत होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अपघातग्रस्तांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. परिसरात शोककळा पसरली. माहिती मिळताच नातलगांनी अपघातग्रस्तांचे घर गाठले. तहसीलदार, मंडळ अधिकारी यांची तसेच पोलीस कर्मचार्‍यांची चमू पाठविण्यात आली. खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांनी अपघाताची माहिती घेतली. वर्ध्याहून अवंती पोहनेकर, संजीवनी शंकरराव गोठे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, राधिका खडसे, तेजस पोकळे, तनिषा तायडे, शोभा वनकर, वृषाली वनकर, ओवी वनकर, करण बुधबावरे, राजेश्री गांडोळे, सुशिल खेलकर, तेजस्विनी राऊत अशी अपघाग्रस्त ट्रॅव्हल्समधील प्रवास करत असलेल्या प्रवाशांची नावे असल्याचे सांगण्यात आले. जखमी झालेल्या हिमाचलप्रदेशच्या कांगडा येथील पंकज रमेशचंद्र या प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. प्रशासनाकडून अपघातग्रस्तांच्या नातलगांना बुलडाण्याकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अ‍ॅम्बूलन्सही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. (Buldhana Bus Accident)

वर्धा येथील राधिका खडसे पुणे येथे शिक्षणाकरिता जात होती. वर्ध्यातील साईनगर परिसरात ती राहत होती. कृष्णनगरातील तेजस पोकळे याला नोकरी लागली होती. पुणे येथील एका कंपनीमध्ये तो रुजू होणार होता. वृशाली परिनीत वनकर, मुलगी ओवी तसेच आई शोभा वनकर साटोडा येथील नातलग माजी सरपंच अजय जानवे यांच्याकडे थांबले होते. ते पुण्याला परत जात होते. झडशी येथील करण बुधबावरे गुरुपौर्णिमेच्या निमित्त्याने बहिणीला आणण्याकरिता पुण्याला जात होता. अवंती पोहनेकर पुण्यात नोकरीच्या निमित्ताने प्रवासात निघाल्या होत्या. वर्धेतील श्रेया वंजारी पुण्याला जात असताना याच प्रवासात राधिका खडसेसुद्धा तिच्यासोबत होती.

सहयोग नगर परिसरात राहणारा प्रथमेश खोडे हा पुण्याला जात होता. पवनार येथील सुशील दिनकर खेलकर याला मुंबई येथून नोकरीकरिता पत्र आले होते. तो कॉलेजमध्ये असलेली कागदपत्रे परत आणण्याकरिता शुक्रवारी रात्री वर्धेवरुन पुणे येथे जाण्यासाठी निघाला होता. राजश्री गांडोळे (४७) पुण्याला जात होत्या . अल्लीपूर येथे राहणारी संजीवनी शंकरराव गोठे ही नोकरीवर रुजू होण्यासाठी जात होती. तनिषा प्रशांत तायडे ही शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रवेशाकरिता पुणे येथे जाणार होती.

Back to top button