Akola News: हिंसाचारात १ जण ठार; ४ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी | पुढारी

Akola News: हिंसाचारात १ जण ठार; ४ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी

अकोला: पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून शनिवारी (दि. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास शहरात (Akola News)दोन गट आमनेसामने आले. यावेळी हाणामारी, दगडफेक, जाळपोळ सुरु झाल्याने दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी झालेल्या गोळीबारात कामावरून घरी जाणारा विलास गायकवाड याचा दुदैवी मृत्यू झाला. तर एक महिला पोलीस कर्मचारीसह जवळपास १० जण जखमी झाले.

घटनेची दखल घेत रात्री उशीरा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जुने शहर, डाबकी रोड, सिटी कोतवाली व रामदास पेठ या चारही पोलिस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे संतप्त झालेल्या एका गटाने तोडफोड व दगडफेक सुरू केल्याने दोन गटांत वाद झाला. परस्परांवर जमाव चालून गेल्याने एकच धावपळ उडाली. जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत दंगेखोरांनी दगडफेक आणि जाळपोळ (Akola News)  केली.

दंगलखोर एकमेकांच्या विरूद्ध नारेबाजी करीत दगडफेक करीत सुटले होते. अनेक दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची नासधूस केली. एक दुचाकी आणि एक चारचाकी गाडी जाळण्यात आली. दंगलखोरांनी पोलीस व्हॅन आणि अग्निशमन दलाच्या गाडीच्या काचा फोडल्या. परिसरातील एक घर पेटवून दिल्यानंतर या भागात आगीचे डोंब उसळल्याने सामान्य नागरिक भयभीत झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. पोलिसांनी रात्री उशीरा परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. खबरदारीचा उपाय म्हणून ४ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यु लावण्यात आला आहे.

Akola News : दंगलीची झळ जिल्हयाला पोहचली

या दंगलीची झळ संपूर्ण अकोला जिल्ह्यात पोहोचली आहे. रविवारी सकाळपासून शहरातील मुख्य गांधी मार्ग, टिळक मार्ग निर्मनुष्य झाला आहे. एरव्ही दिवस रात्र गर्दीने फुललेला हा मार्ग आज सूनसान झाला आहे. सिटी कोतवाली चौक शांत आहे. शहरात ऑटो रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. फळ, भाजी बाजार बंद आहे. जुने शहर, जैन मंदिर, शिवाजीनगर येथील भाजी बाजार संपूर्ण बंद आहे. दंगलीच्या भीतीने जनता बाजारातही लोक फिरकले नाहीत. किराणा बाजार, रविवारी भरणारा चोर बाजार, गांधी रोड चौपाटी बंद असल्याने गांधी रोड ओळखणे कठीण झाले आहे.

पोलिसांची धरपकड सुरुच

याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते. रात्री जवळपास  ३७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय अमरावती, वाशिम व बुलडाणा मधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी दंगलग्रस्त भागात भेट देवून, नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी निमा अरोरा शनिवारी रात्रीपासून घटनास्थळी ठाण मांडून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

पालकमंत्री फडवणीस लक्ष ठेवून

अकोल्यातील सर्व परिस्थितीवर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून होते. रात्रीच आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांना घटनेबाबत माहिती दिली होती. जिल्हाधिकारी व जिल्हा पाोलीस अधीक्षकांना तातडीने फोन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सुचना केल्या. शिवाय भाजप पदाधिका-यांना नागरिकांना मदत पुरवण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा 

Back to top button