चंद्रपुरात पकडला बनावट दारूचा साठा | पुढारी

चंद्रपुरात पकडला बनावट दारूचा साठा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातून आयात केलेल्या विदेशी दारूमध्ये मानवी आरोग्याला घातक ठरणारे द्रव्य टाकून बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत दारुचा साठा जप्त करुन एका आरोपीस अटक केली आहे. रविंद्र उर्फ बिट्टू कंजर असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील जलनगर वॉर्डातील कंजर मोहल्यात आरोपी नामे रविंद्र उर्फ बिट्टु कंजर हा त्याचे स्वतःचे घरी मध्य प्रदेश येथून अवैध्यरित्या विदेशी दारू आयात करीत आहे. त्यानंतर दारू बॉटल मधून काढून त्यामध्ये जास्त नशा आणणारे मानवी आरोग्यास घातक असलेले द्रव्य भेसळ करून ती भेसळ केलेली बनावट दारू त्याने भंगारातून जमा केलेल्या रॉयल स्टॅग डीलक्स व्हिस्की या कंपनीच्या विदेशी दारूच्या बॉटलमध्ये भरून त्याला त्याचे कपंनीचे नक्कली झाकण व बुच लावून बनावट दारूची अवैध्यविक्री करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्या आधारे आरोपी नामे रविंद्र उर्फ बिट्टु कंजर याचे घरी छापा टाकला असता आरोपी हा त्याचे राहते घरी बनावट दारू तयार करीत असतांना पळून गेला.

पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरात रॉयल स्टॅग डीलक्स व्हिस्की या कंपनीच्या जुन्या बॉटलचे तोडलेले बुच, नविन बनावट बुच व झाकण, जुन्या 180 मिली क्षमतेच्या रिकाम्या काचेच्या बॉटल, ऑफिसर चॉईस व्हिस्की कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या केलेल्या प्लॅस्टीक बॉटल, मध्य प्रदेश शासनाचे कागदी लेबल असलेल्या ऑफिसर चॉईस व्हिस्की कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या विदेशी दारूने भरलेल्या 295 नग प्लॉस्टीक बॉटल, रॉयल स्टॅग डीलक्स व्हिस्की कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये बनावट भेसळ दारू भरून त्याला नविन झाकण व बुच लावून असलेल्या 36 नग बॉटल,जुन्या बॉटलचे बूच तोडण्या करीता वापरण्यात येणारे एक कटर, बनावट दारू बॉटल मध्ये भरण्या करीता वापरण्यात येणारी एक प्लॉस्टीक ची चाळी, दोन 5 लिटरच्या प्लॉस्टीकच्या कॅन मध्ये एकूण 10 लिटर भेसळ करण्याकरीता वापरण्यात येणारा उग्रवास असलेला द्रव्य, एका 5 लिटरच्या कॅन मध्ये भेसळ केलेले लालसर उग्रवास असलेला द्रव्य असा 31925 रू. चा बनावट दारू बनविण्याकरीता वापरण्यात येणारा मुद्देमाल मिळून आला.

आरोपी रविंद्र उर्फ बिट्टु रणधीर कंजर याचे विरूध्द रामनगर पोलीस ठाण्यात 420, 328 भादंवि सह कलम 65 ( अ ). 65 (ब), 65 (ड), 65 (ई). 65 (फ). 67. 67(1) (अ), 67(क), 108 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 63 प्रतीलीपी अधिकार अधिनियम 1957 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

Back to top button