यवतमाळ : बंदुकीच्या धाकावर डॉक्टरचे अपहरण; साडेतीन लाखांनी लुटले | पुढारी

यवतमाळ : बंदुकीच्या धाकावर डॉक्टरचे अपहरण; साडेतीन लाखांनी लुटले

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : काम आटोपून घरी परतत असताना एका बंगाली डॉक्टरला रस्त्यात अडवून चार जणांनी बंदूक दाखवित तब्बल साडेतीन लाखाने लुटले. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि. १४) रात्री मारेगाव तालुक्यात घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.पोभास रवींद्रनाथ हाजरा (वय ४८) असे डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हाजरा यांचे निवासस्थान मारेगावात असून याच तालुक्यातील नवरगाव येथे दवाखाना आहे. सोमवारी आपले काम आटोपून रात्री नवरगाववरून मारेगावकडे  दुचाकीने निघाले. याच दरम्यान कारने आलेल्या चौघांनी राज्य महामार्गावर असलेल्या करणवाडीजवळ असलेल्या पेट्रोलपंपसमोर त्यांना अडविले. बंदुकीचा धाक दाखवून त्यांना कारमध्ये बसविले. त्यांचेकडून रोख २४ हजार, सोन्याची अंगठी व चैन, मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर चोरट्यांनी तब्बल पाच लाखांची मागणी करीत हत्या करण्याची धमकी दिली.
अर्धा तास चाललेल्या या थरारीत कमालीच्या दहशतीत आलेल्या डॉ. हाजरा यांनी भितीपोटी तीन लाख रुपये देण्याचे कबुल केले. त्यांनी ही रक्कम वणी येथील मित्राकडून करून देतो असे सांगताच चोरटे डॉक्टरला घेऊन वणीला आले. कारमधील एका चोरट्याने कारची अर्धी काच उघडत मित्राकडून बोलाविलेले रोख तीन लाख रुपये ताब्यात घेत मारेगाव दिशेने कूच केले. काही अंतरावर डॉ. हाजरा यांना सोडून कारसह युवकांनी पोबारा केला. तीन लाख २४ हजार नगदी व इतर सोने व मोबाईल असा किमान तीन लाख ६९ हजार रुपये लुटल्याने मारेगाव तालुक्यात दहशत पसरली आहे. दोन तासाच्या या सिनेस्टाईल लुटमारीची मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरोधात बळजबरीने अपहरण करून गंभीर दुखापत करणे, शस्र बाळगून जीवे मारण्याची धमकी देत लूटमार करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदूक, चाकूच्या धाकवर दरोडा टाकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे तगडे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Back to top button