काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्यांची नियुक्ती निवडणुकीद्वारे व्हावी: आशिष देशमुख | पुढारी

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्यांची नियुक्ती निवडणुकीद्वारे व्हावी: आशिष देशमुख

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे स्वतः जसे निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्ष झाले. त्याप्रमाणेच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्यांची नियुक्ती निवडणुकीद्वारे व्हावी, त्यांची थेट नियुक्ती केली जाऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. या मागणीला अनेकांचे समर्थन असून यासंदर्भात आम्ही दिल्लीत काही ज्येष्ठ वकिलांशी चर्चा केली. निवडणूक आयोग, गरज पडल्यास यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या संविधानानुसार पक्षातील मोठ्या पदावरील व्यक्ती निवडून यावी, अशी व्यवस्था आहे. मल्लिकार्जून खरगे हे निवडणुकीद्वारे काँग्रेसेचे अध्यक्ष झाले, याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, याबरोबरच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची नियुक्तीही निवडणुकीद्वारे व्हावी, अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून या सदस्यांची थेट नियुक्ती पक्षाध्यक्षाद्वारे केली जात आहे. संवैधानिक पद्धतीने पक्ष पुढे जाणे गरजेचे आहे. छत्तीसगडमधील अधिवेशनापूर्वी याच पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आमचा लढा पक्षश्रेष्ठींविरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या देशाला केवळ काँग्रेस वाचवू शकते. मात्र, काँग्रेसला जुन्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडायला हवे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत नवीन लोकांनी येणे गरजेचे आहे. नुकत्याच तीन राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यात कुठेच काँग्रेस दिसत नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्याच त्या लोकांना संधी मिळत असेल, तर पक्ष म्हणून काँग्रेस कधीच प्रगती करू शकणार नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button