नागपूर : गोरेवाड्यात आफ्रिकन सफारीची घोषणा; चित्ता, जिराफ दिसणार | पुढारी

नागपूर : गोरेवाड्यात आफ्रिकन सफारीची घोषणा; चित्ता, जिराफ दिसणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात यावर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. गतवर्षीच्या अधिवेशनातही घोषणा करीत १०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातून सध्या फेन्सिंगची कामे सुरू आहेत. यामुळे चित्ता, जिराफ, झेब्रा यासारख्या प्राण्यांना शहरातच जवळून बघण्याचे नागपूरकरांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येण्याची चिन्हे आहेत.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय देशातील सर्वाधिक विस्तीर्ण प्राणीसंग्रहालयांपैकी एक आहे. जानेवारी २०२१ ला १२० हेक्टरवरील भारतीय सफारीची सुरुवात झाली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची आराखडा व सफारीसाठी मंजुरी मिळाली आहे. आता पुन्हा अर्थसंकल्पातून याबाबतची स्पष्ट घोषणा झाल्याने आगामी काळात कामे झपाट्याने केली जाण्याची शक्यता बळावली आहे.

या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांच्या सुमारे २८ प्रजाती राहतील. यात झेब्रा, सिंह, जिराफ, चित्ता, चिंपांझी, वाइल्डबीस्ट, हिप्पोपोटॅमस, बबून्स यांचा समावेश आहे. ६३ हेक्टर परिसरात भारतीय सफारीमागे अफ्रिकन सफारी असणार आहे. त्यात सुमारे 13 पिंजरे राहतील. साहसी वन्यजीव सफारीच्या बाबतीत आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. आता असाच अनुभव नागपुरातील पर्यटकांनाही घेता येणार आहे.

तुर्त आफ्रिकन सफारीसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचे फेन्सिंग सुरू आहे. पुढच्या टप्प्यात प्राण्यांची योग्य सुविधा होण्याच्या दृष्टीने कन्सल्टंट नियुक्त केले जातील. त्यांच्या सूचनेनुसारच पिंजऱ्यांची रचना असणार आहे. त्यासाठीही निविदा प्रक्रिया केली जाईल. देशविदेशातील प्राणीसंग्रहालयाशी बोलणी सुरू होईल. यापूर्वी दुबई सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्राणीसंग्रहालयाशी बोलणी झाली आहे. या प्राणीसंग्रहालयातून अफ्रिकन प्राण्यांच्या प्रजाती आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. तसेच या सफारीसाठी भारतातील इतर प्राणीसंग्रहालयातूनही प्राणी आणण्याच्या पर्यायावर विचार केला जात आहे.

           हेही वाचलंत का ? 

 

 

 

Back to top button