बुलढाणा : उपजिल्हाधिकारीसह, लिपिक आणि वकील एक लाखांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात | पुढारी

बुलढाणा : उपजिल्हाधिकारीसह, लिपिक आणि वकील एक लाखांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा जिल्ह्यात मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, लिपीक व खासगी वकील यांना  शेतक-याकडून एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली.  या कारवाईनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली. उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, लिपीक नागोराव खरात व खासगी वकील अनंता देशमुख अशी अटक करण्यात आलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

या बाबतच्या अधिक माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिगांव जलसंपदा प्रकल्पामध्ये हिंगणे इच्छापूर येथील एका शेतक-याची दीड एकर जमीन ताब्यात करण्यात आली होती. दरम्यान संबंधित शेतक-याचे निधन झाले. नंतर मोबदल्याची रक्कम भूसंपादन विभागाकडे जमा झाली. मात्र लाभार्थी मयत शेतक-याचे नाव भूसंपादन विभागाकडून चुकीचे नमूद झाल्याने मोबदल्याची रक्कम शेतक-याच्या वारसाला मिळू शकत नव्हती. नावातील चूक सुधारून मोबदल्याची रक्कम देण्यासाठी भूसंपादन अधिकारी भिकाजी घुगे यांनी लिपिक नागोराव खरात व खासगी वकील अनंता देशमुख या तिघांनी या शेतक-याच्या मुलाला दोन लाख सतरा हजाराच्या लाचेची मागणी केली. शेतकऱ्याचे मुलाने एक लाख देण्याबाबतची तडजोड झाली. संबंधित शेतकरी तरुणाने भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली.

बुधवारी (दि. २८) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास एक लाख रुपये घेवून तक्रारदार तरुण शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात पोहोचला. वकील अनंत देशमुख याने लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपीक खरात आणि वकील देशमुख या तिघांनाही रंगेहाथ पकडले. तिन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यातील अधिकारी तथा एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, महेश भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button