नागपूर : शासकीय कार्यालयात मास्क सक्ती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

नागपूर : शासकीय कार्यालयात मास्क सक्ती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवार (दि.२३) सुरू होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रविवारी रात्री विमानतळावर आगमन झाले. यावेळी स्वागताला हजर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आदी सर्व प्रशासकीय अधिकारी मास्क लावलेले होते हे विशेष. शहर हद्दीत असा कुठलाही आदेश मनपा आयुक्तांनी काढलेला नसल्याने आज ख्रिसमस, रविवारच्या निमित्ताने रस्त्यावर तुफान गर्दी होती.

ठिकठिकाणी रात्री वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत मास्कचा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी एका पत्राद्वारे केले आहे. कोरोनाच्या तयारी संदर्भातील आढावा २७ डिसेंबर रोजी मॅाक ड्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणांची सज्जता पडताळून बघितली जाणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढाव बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राज गजभिये, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय बिजवे, एम्सच्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.विभा दत्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. एन.बी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, टास्क फोर्सचे रवींद्र सरनाईक, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चीनसह पूर्वेकडील देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. चीनमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विमानतळावर इतर देशांमधून येणा-या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. काही प्रवाशांनी आज यासंदर्भात असहकार पुकारला होता.

हेही वाचंलत का?

Back to top button