अमरावती : पिस्तुल बागळणाऱ्यास दोन वर्षांचा कारावास | पुढारी

अमरावती : पिस्तुल बागळणाऱ्यास दोन वर्षांचा कारावास

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अवैधरित्या पिस्तुल सारखे घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. फिरोज शहा उर्फ भुर्या युसूफ शहा (वय २८, रा. हबीब नगर क्र. १) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपुरी गेट हद्दीतील हबीब नगर न. १ येथे १५ सप्टेंबर २०१५ रोजी आरोपी फिरोज शहा उर्फ भुर्या युसूफ शहा हा अवैधरित्या पिस्तुल बाळगून आहे, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यावरुन पोलीस उपनिरीक्षक रवी राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ देशी पिस्तुल व २ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार बाळू ढाकरे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (क्रमांक ७) यांच्या न्यायालयात आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. त्यानुसार न्यायालयाने आरोपी फिरोज शहा उर्फ भुर्या युसूफ शहा याला २ वर्ष साधा कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार दामोधर मिलखे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button