महाराष्ट्राच्या हक्काची इंच न इंच जागा घेणार : अजित पवार | पुढारी

महाराष्ट्राच्या हक्काची इंच न इंच जागा घेणार : अजित पवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  सीमा भागातील मराठी माणूस जेवढी जागा आमच्याकडे आली पाहिजे, असे म्हणतो तो भाग हा महाराष्ट्रात आला पाहिजे. आम्ही आमच्या हक्काची इंच न इंच जागा घेऊ, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत एकमेकांच्या राज्यातील लोकांना येण्याजाण्यास कोणी अडवू नका, असे सांगण्यात आले. तरीही कर्नाटक वाद वाढवीत आहे. पुन्हा ते ठराव करत आहेत. हे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश आहे, असे सांगतानाच शिंदे फडणवीस सरकार कशामुळे घाबरत आहेत आणि का ठराव करत नाहीत? असा सवालही अजित पवार यांनी केला.

ते म्हणाले, मराठी माणूस तेथे राहतो, पिढ्या न पिढ्या लढतोय, त्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने करणे अपेक्षित आहे. पण ते होताना दिसत नाही. जत तालुक्यातील काही गावांनी आम्हाला विकासकामांना निधी देणार नसतील तर आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या अशी मागणी केली. मात्र कारण नसताना लक्ष विचलित करण्यासाठी यामागचा सूत्रधार दुसरा कोणतरी आहे आणि ते लोकांच्या भावना भडकवत आहेत, आरोप विरोधकांवर केला जात आहे.

Back to top button