

चंद्रपूर : व्याघ्र दर्शनाच्या ओढीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर आता वनविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोहर्ली–पद्मापूर मार्गावर एका वाघाचा पाठलाग करून व्हिडिओ बनवणाऱ्या बेजबाबदार पर्यटकांविरुद्ध वनविभागाने भारतीय वन अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.
१५ मार्च २०२६ रोजी मोहर्ली–पद्मापूर रस्त्यावर काही पर्यटकांनी आपली वाहने थांबवून वाघाचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ व्हिडिओ काढण्यावर न थांबता काही उत्साही पर्यटकांनी चक्क वाहनातून खाली उतरून वाघाचा मार्ग अडवला आणि त्याचा पाठलाग केला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (Social Media) व्हायरल होताच वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केला होता.
वनविभागाने या घटनेची त्वरित दखल घेत वनगुन्हा क्रमांक ०९६५४/२११३३३ नोंदवला आहे. या प्रकरणी वनविभागाने खालील कारवाईचे संकेत दिले आहेत:
वाहन जप्ती : वन्यजीवांच्या हालचालीत अडथळा निर्माण करणाऱ्या त्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
न्यायालयीन कारवाई : व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर खटला भरला जाणार आहे.
वाघाच्या भ्रमणमार्गावर वाहने थांबवून अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे. सध्या आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांना कडक शासन केले जाईल.
— संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली
या व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तींबाबत कोणाकडे काहीही माहिती असल्यास, त्यांनी ९८३४६८९५४१ या क्रमांकावर वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
वन्यजीव दर्शनादरम्यान सुरक्षित अंतर राखणे आणि वाहनातून खाली न उतरणे हे नियम पाळणे अनिवार्य आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि वन्यजीवांना त्रास देऊन केलेले असे 'स्टंट' तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खाऊ घालू शकतात.