

लोणार ःजगप्रसिद्ध उल्कापातातून निर्माण झालेले लोणार सरोवर हे राज्यातील महत्त्वाचे नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून त्याच्या जतन-संवर्धनासोबत पर्यटन विकासाला गती देण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंगल यांनी लोणार येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. त्यांनी लोणार विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहे.
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या समवेत विभागीय आयुक्तांनी सरोवर परिसरातील सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, बांधकामे, सौंदर्यीकरण आणि पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केली. लोणार सरोवर हे जागतिक स्तरावर महत्त्वाचे वारसा स्थळ मानले जात असल्याने येथील विकास आराखडा पर्यटनविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व कामे निर्धारित कालावधीत व उच्च दर्जाने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी वन विभाग, नगर परिषद तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
लोणार विकास आराखड्या अंतर्गत सरोवर परिसरात विविध पायाभूत सुविधा उभारणे, पर्यटकांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सौंदर्यीकरण करणे आणि ऐतिहासिक मंदिरांचे जतन-संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. या कामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामांच्या प्रगतीबाबत माहिती घेतली तसेच कामांची गुणवत्ता राखत विकास कामे नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
स्थानिक नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत विभागीय आयुक्तांनी संबंधित तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आवश्यक त्या पातळीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या पाहणी दौऱ्यात विभागीय वन अधिकारी यशवंत नागुलकर, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, नगराध्यक्षा मीरा मापारी, मुख्याधिकारी बोबडे, पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी तसेच नगर परिषदेचे अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.
विकास आराखडा तयार करण्याची मागणी
स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन लोणार परिसरातील काही महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. गायमुख धार पुन्हा धार्मिक स्नानासाठी खुली करण्याची मागणी, सरोवरातील वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन गोड्या पाण्याचा नियंत्रित उपसा करण्याचा प्रस्तावा सह लोणार मधील प्राचीन मंदिरांना जोडून स्वतंत्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी केली.
विकासा चालना मिळेल
लोणार सरोवराच्या जतनासोबत पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास लोणार हे आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळवेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.