

Amravati laborers injured
अमरावती : वरुड तालुक्यातील मजुरांना घेऊन जाणार्या पिकअप वाहनाचा नागपूर जिल्ह्यातील मोवाड परिसरात वर्धा नदीच्या काठावर सोमवारी (दि.१६) भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल १९ मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना तातडीने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातून वरुड तालुक्यातील जरूड, बहादा आणि इसंब्री या गावांतील सुमारे ३१ मजूर पिकअप वाहनातून कामासाठी जात होते. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील मोवाड जवळ वर्धा नदीच्या काठावर वाहन जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन भीषण अपघात झाला.
अपघात इतका तीव्र होता की वाहनातील अनेक मजूर गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. या अपघातात १९ मजूर गंभीर जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान एका वाहनात एवढ्या मोठ्या संख्येने मजूर प्रवास करत असल्याने सुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. या घटनेमुळे वरुड तालुक्यातील संबंधित गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.