अकोल्यात रंगताहेत कुस्तीचे डावपेच; आंबेडकर चषक राज्य कुस्ती स्पर्धेला सुरूवात | पुढारी

अकोल्यात रंगताहेत कुस्तीचे डावपेच; आंबेडकर चषक राज्य कुस्ती स्पर्धेला सुरूवात

अकोला: पुढारी वृत्तसेवा : येथील स्वराज भवनाच्या प्रांगणात शनिवारी (दि. १०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. स्पर्धेत राज्यभरातील मल्ल सहभागी झाले आहेत. एका तपानंतर अकोल्यात कुस्ती स्पर्धांचे भव्य असे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातवरण पसरले आहे.

विदर्भ केसरी नजीर पहिलवान, उद्योजक विवेक पारसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट्ट, आयोजक आकाश इंगळे, गौतम गवई आदी मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांचा हस्ते लढतींना प्रारंभ करण्यात आला. कुस्ती स्पर्धेच्या निमित्त अकोला शहरातील स्वराज भवन प्रांगणाला वेगळी झळाळी आली आहे. भव्य माती आणि गादीचे मैदान तयार करण्यात आले आहे. लढती बघण्यासाठी अकोलेकर कुस्ती प्रेमींची मोठी गर्दी होत आहे.

अमरावती अन् अकोल्याची विजयी सुरुवात

स्पर्धेतील पहिली लढत खुल्या गटात मुलांमध्ये अभिजित राखे अमरावती आणि ओम गाडगे पातूर या दोन मल्लात झाली. यामध्ये अमरावतीच्या अभिजीतने ही लढत जिंकून स्पर्धेला विजयी सलामी दिली. तर महिला गटातील पहिली लढत मनिषा वंजारी आणि समीक्षा चव्हाण या अकोल्यातील मल्लांमध्ये झाली. त्यामध्ये समीक्षाने लढत जिंकली. विदर्भ केसरी नदीम खान यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली.

नियोजनाचा अभाव

स्पर्धा आयोजकांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून आला. स्पर्धा उद्घाटन सोहळा नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तास उशिराने सुरू झाल्याने कुस्तीप्रेमींना मैदानात ताटकळत उभे राहावे लागले. तर योग्य नियोजनाअभावी स्पर्धेसाठी बाहेरगावहून आलेल्या खेळाडूंना त्रास सहन करावा लागला. वजन मापासाठी सकाळपासून स्पर्धा स्थळी खेळाडू हजर झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button