रेशीमबागेतील संघ कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी! | पुढारी

रेशीमबागेतील संघ कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आणि मैदानाजवळीलच सुरेश भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आल्यानंतर नागपुरात खळबळ माजली आहे. नुकताच संघ शिक्षा वर्ग आटोपला, लवकरच शहरात पंतप्रधान येत आहेत. हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागली आहे. अशा स्थितीत या पत्राचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

पोलीस तपासात हे पत्र महापारेषणच्या एका कार्यकारी अभियंत्याने पाठविल्याचे समोर आल्यानंतर सारेच बुचकाळ्यात पडले. पोलिसांनी या अभियंत्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. सध्यातरी आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याची सबब पुढे करीत या अभियंत्याने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. यासोबतच वेगवेगळ्या शक्यताही समोर येत आहेत. पोलीस तपासातूनच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी हे पत्र आले होते. त्यामध्ये संघाचे रेशीमबाग येथील कार्यालय, रेशीमबाग जवळील सुरेश भट सभागृह या ठिकाणी धमाका करु अशी धमकी दिली गेली. यासोबतच एक बॉम्बचे चित्रही त्या पत्रावर होते. सक्करदरा पोलीस स्टेशनचे विशेष पथक गेले काही दिवस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्ट ऑफिसमध्ये निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्या व्यक्तीने कबुली दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button