बुलढाणा : आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली | पुढारी

बुलढाणा : आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात गांधी भवन परिसरात आयोजित केलेल्या सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. शिंदे गटाचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांचे कार्यालय याच परिसरात असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असे कारण पोलीस प्रशासनाकडून समोर आणले गेले आहे व नियोजित सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.

बुलढाणा शहरातील गांधी भवन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जाहीर सभांसाठी ते प्राधान्याने निवडले जाते. त्यानुसार ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मागण्यात आली. परंतु, या नियोजित सभेचा धसका विरोधी शिंदे गटाने घेतला असल्यानेच राजकीय दबावाखाली सभा नाकारण्याचे काम केले जात आहे. असे ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे.

जळगाव, खान्देश येथील सभेलाही अशाच कारणांमुळे परवानगी नाकारली गेली आणि सिल्लोड येथेही आदित्य ठाकरेंच्या ७ नोव्हेंबरच्या सभेला आधी परवानगी नाकारली. नंतर सभास्थळ बदलण्याचे सांगून पोलिसांनी सिल्लोडमध्ये परवानगी दिली. मात्र, बुलढाण्यामध्येही सभास्थळ बदलण्याचे सांगितले जाईल की, सभाच होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव कायम राहील याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button