नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव ; श्रीगोंदा नगरपालिकेत काँग्रेस-भाजप नगरसेवकांचे जुळले सूर | पुढारी

नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव ; श्रीगोंदा नगरपालिकेत काँग्रेस-भाजप नगरसेवकांचे जुळले सूर

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांना पदावरून हटविण्यासाठी काँग्रेस-भाजप नगरसेवकांचे सूर जुळले. काँग्रेस नगरसेवकांच्या पुढाकारला प्रतिसाद देत भाजपच्या 11 नगरसेवकांसह 16 नगररसेवकांनी शुक्रवारी (दि.4) जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात अशाप्रकारे अविश्वास दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना अहमदनगरच्या श्रीगोंद्यात घडली. आता 14 महिन्याच्या कालावधीसाठी नगराध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांतील धूसफूस समोर आली अन् नगराध्यक्ष मिस्टर मनोहर पोटे यांना गटनेते पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. भाजपच्या 11 नगरसेवकांनी साथ दिल्यानंतर सत्ताधारी-विरोधक एकत्र आले अन् शुक्रवारी अविश्वास ठरावाला मूर्त स्वरूप मिळाले. काँग्रेसचे नगरसेवक गणेश भोस यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांना पदावरून हटविण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. सत्ताधारी काँग्रेसचे 5 व विरोधी भाजपचे 11, अशा एकूण 16 नगरसेवकांच्या त्यावर सह्या आहेत.

नगराध्यक्षा पोटे या मनमानी कारभार करत आहेत. तसेच, नगरसेवकांमध्ये दुजाभाव करत असून, विश्वासात घेत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात नगरपरिषदेच्या अनेक कामात अनियमितता असून, अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांच्या काळात घडली आहेत, असे जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या अर्जात म्हटले आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे 8, तर भाजपचे 11 नगरसेवक असून, नगराध्यक्षा पोटे या काँग्रेसच्या चिन्हावर थेट जनतेतून निवडून आलेल्या आहेत.

श्रीगोंदा नगरपरिषदेत काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये फूट पडली होती. नगराध्यक्षांचे पती तथा काँग्रेसचे गटनेते मनोहर पोटे यांच्या विरोधात भूमिका घेणार्‍या काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी गणेश भोस यांची गटनेते पदी नियुक्ती केली होती. पोटे यांच्यावरील नाराजीतून शुक्रवारी विरोधी भाजपच्या 11 नगरसेवकांना सोबत घेत कॉग्रेस नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.

काँग्रेसचे 5 नगरसेवक विरोधात गेल्यामुळे आता राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक स्वतः मनोहर पोटे व नगराध्यक्षा शुभांगी पोटे, असे 4 जण त्याच्याकडे राहिले आहेत. विरोधात गेलेले आघाडीचे 5 नगरसेवक व भाजपचे 11 नगरसेवक, असे 16 नगरसेवक असे 16 विरुद्ध 4 असे चित्र आता श्रीगोंदा नगरपरिषदेत तयार झाले आहे. श्रीगोंदा नगरपालिकेत एवढ्या घडामोडी घडत असताना नगराध्यक्षा शुभांगी पोटे व मनोहर पोटे यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे.

अविश्वास ठरावास नेत्यांचे पाठबळ
नगराध्यक्षा शुभांगी पोटे या ज्या नेत्यांच्या पाठबळावर नगराध्यक्षा झाल्या, त्या नेत्यांनाही जुमानत नसल्याने, हे नेतेही त्यांच्यावर नाराज होते. हा अविश्वास ठराव दाखल करण्यास त्यांचाही हिरवा कंदिल आहे. एवढेच नाहीतर या राजकीय बदलाला थेट मुंबईतील नेत्यांकडून पाठबळ मिळत असून, या सर्व प्रक्रियेवर मुंबईतून लक्ष ठेवले जात आहे.

दैनिक ‘पुढारी’चा अंदाज ठरला खरा
श्रीगोंदा नगरपालिकेतील घडामोडी बाबत दैनिक ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल होणार असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. शुक्रवारी अविश्वास ठराव अर्ज दाखल करण्यात आल्याने दैनिक ‘पुढारी’चा अंदाज खरा ठरला आहे.

काँग्रेस-भाजप एकत्र
राज्यात एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणारी काँग्रेस व भाजप मात्र श्रीगोंद्यात एकत्र आले आहेत. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या शुभांगी पोटे यांना पदावरून हटविण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनीच पुढाकार घेऊन भाजपच्या नगरसेवकासोबत बैठक घेऊन एवढा मोठा धाडसी निर्णय घेण्यात आला.

Back to top button