आदिवासी समाज मूलभूत गरजांपासून वंचित पाणी, रस्ता, वीज, घरकुले देण्याची मागणी | पुढारी

आदिवासी समाज मूलभूत गरजांपासून वंचित पाणी, रस्ता, वीज, घरकुले देण्याची मागणी

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  ‘हर घर, हर विकास’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रसारित होत असताना संगमनेर तालुक्यातील कौठे – कमळेश्वर येथील आदिवासी समाज मात्र अनेक वर्षांपासून पाणी, वीज, रस्ते व घरकूल या मूलभूत गरजांपासून वंचित असल्याचे चित्र दिसत आहे. संगमनेर शहरापासून पूर्वेकडे 15 कि. मी. च्या अंतरावर व शिर्डी मार्गावर असणार्‍या कौठे-कमळेश्वर येथील असणार्‍या आदिवासी समाजास माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या काळात गावापासून दोन कि. मी. च्या अंतरावर असणार्‍या डोंगराळ भागात मिळालेल्या वनजमिनीतून आपला उदरनिर्वाह करीत आहे.

अनेक वेळा ग्रामसभेत भाग घेऊन वीज, रस्ता, पाणी व घरकुल या समस्या मांडूनही या मूलभूत गरजा पुरविण्यास सत्ताधारी असमर्थ असल्याचे वेळोवेळी दिसून आले. या आदिवासी वस्तीच्या आवती भोवती जंगल परिसर असल्याने रात्री -अपरात्री बिबट्यासह जंगली जनावरे फिरकत असल्याने गायी, शेळ्या व कुत्रे हे पाळीव प्राणी एक-एक करून फस्त केल्याचे आदिवासींकडून सांगितले जात आहे.
या ठिकाणी पिंजरा लावण्याबाबत सरपंचांकडे मागणी करण्यात आली. त्यांनीही पिंजरा लावण्याचे अश्वासन दिले.

परंतु अद्यापि पिंजरा लावण्यात आलेला नाही. ऐन दिवाळीत दोन कि. मी. च्या आजूबाजूला लखलखाट असताना आदिवासी समाज मात्र अंधारात राहिला. अनेक निवडणुकीच्या काळात रस्ता, वीज, पाणी व घरकुल देऊ, अशी आश्वासने नेत्यांकडून देण्यात आले. मात्र थोड्या प्रमाणात घरकुले देऊन विकास झाल्याचा देखावा करत असल्याचे उमाजी मोरे यांनी सांगितले. मध्यंतरी आदिवासी वस्तीवर वीज मंजूर झाली. सिमेंट पोलही येऊन पडले. मात्र अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वीज देणे सोडा, आलेले वीजेचे खांबही गायब झाले.

थोड्याच अंतरावर असणार्‍या महादेव मंदिरापर्यत वीज येते मग आम्हाला जाणूनबुजून वीज दिली जात नाही का? अशी शंका आता आदिवासी महिला – पुरुषांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. गावापासून दोन कि. मी. च्या अंतरावर पाऊल वाट आहे. त्यामुळे आजारी व्यक्तीला झोळी अथवा पाठीवरच गावापर्यंत आणवे लागते. तर पावसामुळे आजूबाजूला साठलेल्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याचे भागून जाते. मात्र जानेवारी- फेब्रुवारीत मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तरी लवकरात लवकर रस्ते, पाणी, वीज व घरकुल या मूलभूत सुविधा त्वरित द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दादाभाऊ धोंडिबा मोरे, गंगा मोरे, उमाजी मोरे, चिमाजी मोरे, भीमा मोरे, विष्णू मोरे, लक्षण मोरे, भाऊसाहेब मोरे, रावसाहेब मोरे, आण्णा मोरे आदिंनी दिला आहे.

 

अनेक वर्षांपासून वास्तव्य असताना मंत्री, आमदार हे आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरकलेच नाही, केवळ स्थानिक नेत्यांनी निवडणुकांपुरतेच आश्वासने देत वीज, पाणी, रस्ते व घरकुल या समस्यांकडे कानाडोळा केले.
                                                   – उमाजी धोेंडिबा मोरे (कौठे – कमळेश्वर)

Back to top button