भंडारा : ‘लाचलुचपत’च्या चौकशीच्या भीतीने वन कर्मचा-याची आत्महत्या | पुढारी

भंडारा : ‘लाचलुचपत’च्या चौकशीच्या भीतीने वन कर्मचा-याची आत्महत्या

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईबाबत चौकशीसाठी बोलविलेल्या वन विभागाच्या क्षेत्र सहाय्यकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील कांद्री वनपरिक्षेत्रातील गायमुख जंगलात आज (दि. 31) दुपारी उघडकीस आली. अजाबराव सीताराम लोहारे (वय 52, रा. उमरेड, जि. नागपूर) असे मृत क्षेत्र सहाय्यकाचे नाव असून ते लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत होते. तर जांब या गावी तो भाड्याने राहत होते.

25 ऑगस्ट रोजी लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील दोन वनरक्षक आणि एका वनमजुरावर भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली होती. हे तीनही कर्मचारी अजाबराव लोहारे याचे कनिष्ठ कर्मचारी होते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी अजाबराव लोहारे यांना 29 ऑगस्ट रोजी बोलविले होते. या प्रकाराचा जबर धसका अजाबराव यांनी घेतला. ते 28 ऑगस्टपासून बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाही.

दरम्यान, बुधवारी दुपारी कांद्री वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारी गायमुखच्या जंगलात गस्तीवर असताना अजाबराव यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. वनकर्मचा-यांनी ही माहिती लेंडेझरी वन विभागाला दिली. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मृतक अजाबरावच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा आप्त परीवार आहे.

Back to top button