चंद्रपूर : भद्रावती हादरले, युवकाची धारदार शस्‍त्राने हत्‍या | पुढारी

चंद्रपूर : भद्रावती हादरले, युवकाची धारदार शस्‍त्राने हत्‍या

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भद्रावती येथील पिपरबोडी वस्तीत नृत्य वर्ग चालविणाऱ्या एका तरूणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना (रविवार) सायंकाळी घडली. सूरज शंकर शेट्टी (वय ३०) असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या युवकाचे नाव आहे. संशयीत आरोपी फरार झाला आहे. या घटनेने भद्रावती शहर चांगलेच हादरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती शहराला लागूनच असलेल्या पिपरबोडी वस्तीत सूरज शंकर शेट्टी हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शहरातील जुन्या मच्छी मार्केटजवळ तो नृत्य वर्ग चालवायचा. यासोबतच तो मजुरीचीही कामे करायचा.
काल (रविवार) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सूरजवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना लोकांना माहीत होताच दोन व्यक्तींनी त्याला स्कुटीवर बसवून येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मृत तरूणाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

भद्रावतीत गुन्हेगारीच्या घटनात वाढ होतेय 

काही महिन्यापूर्वी भद्रावती शहरामध्ये एका युवतीची निर्घूण हत्या करण्यात आली होती. डोके आणि धड वेगवेगळे करून एका नदीमध्ये डोक्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. खूप दिवसांपर्यंत या घटनेचा तपास लावण्यास विलंब झाला होता. तालुका ते जिल्हास्तरावरील संपूर्ण पोलिस यंत्रणा त्या युवतीच्या हत्येचा तपासात गुंतल्यानंतर त्या युवतीच्या हत्तीचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले होते. शांत संयमी असलेले भद्रावती शहर आता गुन्हेगारीचे आलेखामध्ये वर चढत आहे. एका नृत्य वर्ग चालविणा-या युवकाच्या हत्येच्या घटनेने भद्रावती शहर हादरले आहे. शिवाय अन्य छोट्या मोठ्या घटना शहरात नित्याची बाब झाली आहे. आता सणासुदीचे दिवस सूरू झाले आहे. अशा स्वरूपाच्या घटनांवर आळा घालणे आणि शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलिस विभागाने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button