ठाणे : ‘त्‍या’ मोठ्या खड्ड्याने घेतला तरुणाचा जीव; घटना सीसीटीव्हीत कैद | पुढारी

ठाणे : 'त्‍या' मोठ्या खड्ड्याने घेतला तरुणाचा जीव; घटना सीसीटीव्हीत कैद

नेवाळी (ठाणे) ; पुढारी वृत्तसेवा: दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यामुळे गणेश पाले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, स्थानिक मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून ट्विट करत कामांच्या फक्त कागदावरच्या घोषणा होत आहेत. पण कामं होत नाहीत. अजून किती बळी घेणार? असा सवाल स्‍थानिकांतून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सुद्धा ट्विट करत दिवा आगासन रोडवर अजून ठाणे महापालिका किती लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे ? असा सवाल ठाणे महापालिकेला केला आहे.

गेल्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश उत्सव जवळ आल्याने सर्वत्र खरेदीसाठीची लगबग सूरू आहे. दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे आहेत. रविवारी रात्री गणेश पाले रात्री आठ वाजता या रस्त्यावरून खड्डे चुकवत जात होता. मोठा खड्डा चुकवत असताना त्याचा तोल गेला आणि एका ट्रकच्याखाली आला. ट्रकखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला.

यापूर्वीही याच रस्त्यावर अपघात झाले आहेत. मात्र ठाणे महापालिकेचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. एककीकडे महापालिकेचे अधिकारी स्मार्ट सिटीचे पुरस्कार घेऊन आपली प्रशंसा करत आहेत, मात्र रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्‍थानिक नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button