Video : चंद्रपूर : पाण्यात ‘योग’ ; 85 वर्षीय ‘जल योग’ साधकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद | पुढारी

Video : चंद्रपूर : पाण्यात 'योग' ; 85 वर्षीय 'जल योग' साधकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील 85 वर्षीय जलयोग साधकाने पाण्यात तासभर तब्बल 37 प्रकारचे योग सादर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची HARENG/2010/32259 या क्रमांकाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. कृष्णराव नागपुरे असे त्यांचे नाव असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आज (दि.२८) क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात त्यांनी सादरीकरण केले.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक न्यायाधीश डॉ. मनोज तत्ववादी यांची उपस्थिती

21 जून या जागतिक योग दिनी त्यांनी पाण्यातील विविध प्रकारचे योग सादरीकरण केले होते. ते योग इंडिया बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत पोहोचले होते. या आधारावर त्यांच्या पाण्यातील योगाबद्दल नोंद करण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची चमू आज नियोजित तारीख व वेळेनुसार चंद्रपुरात पोहोचली होती. या चमुसमोर कृष्णराव नागपूरे यांनी 37 प्रकारचे योग सादर करून आपले नावे नवा विक्रम नोंदविला आहे. या चमूमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक न्यायाधीश डॉ. मनोज तत्ववादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी दहा वाजता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जुरीच्या पुढे कृष्णराव नागपुरे यांनी जलतरण तलावात २४ प्रकारचे योग प्रात्यक्षिके करून दाखविली. याशिवाय १३ प्रकारचे पाण्यातील विविध पोहण्याचे प्रकार करून दाखविले. एकूण ३७ प्रकारचे योग प्रकार त्यांनी एक तासाच्या कालावधीत सादरीकरण करून दाखविले. यासाठी त्यांना ऐंशी वर्षांच्या पुढील लोकांच्या पाण्यातील योगाच्या सर्वात जास्त कवायती यासंदर्भात त्यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यात आले.

यापूर्वी भारतात या प्रकारचा प्रयत्न झालेला नाही

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने त्यांना किमान आठ प्रकारात पाण्यात योगाची प्रात्यक्षिके सादर करावयाची होती. त्यांनी तब्ब्ल ३७ प्रकाराचे जलयोग सादर केले हे विशेष. हा विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे न्यायाधीश डॉ. मनोज तत्ववादी यांनी या प्रकारचा प्रयत्न भारतात यापूर्वी झालेला नाही. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने योगाची संपूर्ण प्रात्यक्षिके योगशास्त्राचे अनुसार योग्य की अयोग्य तपासून पाहण्यासाठी योग शिक्षकांची उपस्थिती असावी, अशी अट ठेवली होती. यावेळी विजय चंदावार यांच्या रूपाने ती पूर्ण झाली.

पाण्याची खोली ८ ते १० फूट किमान असावी, जलतरण केंद्राची रीतसर परवानगी घ्यावी, प्रात्यक्षिक करताना डॉक्टरांची टीम उपस्थित असावी, योग प्रकाराची प्रत्येक मुद्रा ही शंभर टक्के पूर्ण केलेली असावी, एखाद्यावेळेस अपूर्ण आकृती मोजली जाणार नाही, अशा अटी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे दिल्या होत्या. त्या सर्व अटींनुसार कृष्णराव नागपूरे यांनी जल योग सादरीकरण केल्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंदविली गेली.

डॉक्टरांकडून कृष्णराव नागपुरे यांची तपासणी

तत्पूर्वी कृष्णराव नागपुरे यांची प्रकृती हे योग प्रकार करण्यासाठी तंदुरुस्त आहे, असा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. त्यानंतर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, नगरसेवक पप्पू देशमुख, माजी नगरसेविका सुनिता लोंढिया, ज्येष्ठ नागरिक विजय चंदावार, महापारेषण अधीक्षक अभियंता प्रफुल अवघड, समशेर बहादूर समन्वयक जिल्हा नेहरू केंद्र, डॉ. अजय कांबळे, पर्यावरण तज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणे, डॉ योगेश दूधपचारे, माजी नगरसेवक बंडू हजारे, जलतरण केंद्रातील प्रशिक्षक निळकंठ चौधरी यांचे उपस्थितीत कृष्णराव नागपुरे गुरुजी, यांनी योगाची ३७ प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यानंतर कृष्णराव नागपुरे गुरुजी यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे पदक प्रमाणपत्र आणि टेन देऊन गौरव करण्यात आला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button