Congress President Election : काँग्रेस अध्‍यक्षपदासाठी १७ ऑक्‍टोबरला मतदान, १९ ऑक्‍टोबर राेजी मतमोजणी | पुढारी

Congress President Election : काँग्रेस अध्‍यक्षपदासाठी १७ ऑक्‍टोबरला मतदान, १९ ऑक्‍टोबर राेजी मतमोजणी

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्‍यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम अखेर ठरला आहे. पक्षाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारणीच आज बैठक झाली. यावेळी अध्‍यक्षपदासाठीच्‍या निवडणूक कार्यक्रमावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. ( Congress President Election ) त्‍यानुसार काँग्रेस अध्‍यक्षपदासाठी १७ ऑक्‍टोबरला मतदान होईल तर १९ ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्‍टेंबर रोजी जारी केली जाईल. अध्‍यक्षपदासाठी २४ ते ३० सप्‍टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्‍याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला. यानंतर पक्षातील नाराज नेत्‍यांची विधाने आणि अध्‍यक्ष निवडीवर सवाल केले जावू लागले होते. आज ( दि. २८) पक्षाच्‍या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत नवीन अध्‍यक्ष निवड आणि निवडणूक तारखांवर चर्चा झाली. आरोग्‍य तपासणीसाठी सोनिया गांधी सध्‍या विदेश दौर्‍यावर आहेत. त्‍यांच्‍याबरोबर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत. सोनिया गांधी यांनी व्हर्चुअल रुपात या बैठकीचे अध्‍यक्षस्‍थान भूषवले. त्‍यांच्‍याबरोबर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेही उपस्‍थित होते.

काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वी अध्‍यक्ष पदाची निवडणूक टाळली होती. ( Congress President Election ) पक्षाने ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये पक्षाध्‍यक्ष निवडणूक ही २१ ऑगस्‍ट ते २० सप्‍टेंबर २०२२ या कालावधीत होईल, असे स्‍पष्‍ट केले होते. पक्षाच्‍या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्‍यक्ष मधुसुदन मिस्‍त्री यांच्‍यासह केसी वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, मुकुल वासनिक, पी चिदंबरम, राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्‍यमंत्री भूपेश बघेत आदी राष्‍ट्रीय कार्यकारणीच्‍या बैठकीला उपस्‍थित होते. या बैठकीनंतर जयराम रमेश म्‍हाणले की, पक्षाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारणीत अध्‍यक्ष निवडणुकीचे वेळापत्रक सादर करण्‍यात आले. याला सर्वसमंती मिळाली आहे.

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, “सोनिया गांधी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील बैठकीत काँग्रस अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकचा कार्यक्रम निश्‍चित करण्‍यात आला आहे. अध्‍यक्षपदासाठी २४ सप्‍टेंबर ते ३० सप्‍टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. मतदान १७ ऑक्‍टोबरला तर १९ ऑक्‍टोबरला मतमोजणी होईल.  दरम्‍यान, राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गहलोत, राज्‍यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्‍लिकार्जुन खर्गे, ज्‍येष्‍ठ नेते हरीश रावत यांच्‍यासह अनेक ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी राहुल गांधी यांनीच अध्‍यक्ष व्‍हावे, अशी मागणी केली आहे. मात्र राहुल गांधी यांनी याला नकार दिला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा पराभवला सामोरे जावे लागल्‍याने राहुल गांधी यांनी अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

हेही वाचा : 

 

Back to top button