POCSO Act : बालिकेसोबत गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाला पाच वर्षाची शिक्षा | पुढारी

POCSO Act : बालिकेसोबत गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाला पाच वर्षाची शिक्षा

अकोला; पुढारी वृत्तसेवा : आठ वर्षीय बालिकेसोबत गैरवर्तन करणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धाला पोस्को कायद्यांतर्गत पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व १५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी ही शिक्षा सुनावली. निरंजन गोंडुजी उमाळे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे.

उरळ पोलीस स्टेशनमध्ये १० जुलै २०१८ रोजी निरंजन गोंडुजी उमाळे (रा. नया अंदुरा) या वृद्धाविरुद्ध आठ वर्षीय बालिकेसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही बालिका सकाळच्या वेळी घरी एकटीच असताना आरोपीने तिच्या सोबत अश्लील वर्तन केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. अशी फिर्याद पीडितेच्या वडिलांनी दिली होती. या प्रकरणाचा तपास करून उरळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतिश पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

न्यायालयात या प्रकरणी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुरावे लक्षात घेता आरोपीस भा.दं.वी. कलम ३७६ च्या गुन्ह्यात सबळ पुरावा नसल्याने निर्दोष ठरविण्यात आले. मात्र, कलम ३५४ (अ) मध्ये दोषी आढळल्याने ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास, पोक्सो कलम सात-आठमध्ये पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाची बाजू ॲड. किरण खोत यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण ढोकणे यांनी काम बघितले.

हेही वाचा

Back to top button