नांदेड : घाटंजी तालुक्यातील ३ बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

नांदेड : घाटंजी तालुक्यातील ३ बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

घाटंजी, पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिखलवर्धा, कुर्ली व पारवा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण यांनी धाड टाकून परवाना नसलेल्या डॉक्टरवर कारवाई केली. डॉ. अजित विश्वास (वय ६०, रा. पारवा), डॉ. शरद गंपावार (वय ६० रा. कुर्ली) व डॉ. सम्राट अधिकारी (वय ३२, रा. चिखलवर्धा) या तिघांविरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

घाटंजी तालुक्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय परवाना नसलेले बोगस डॉक्टर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राप्त झाली होती. त्यावरुन घाटंजी तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण यांना दिले होते. त्यानुसार डॉ. धर्मेश चव्हाण, पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुराम, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, वर्कर निता कणाके व पथकाने धाडसत्र सुरू केले. यावेळी वैद्यकीय परवाना नसल्याचे या तिघा डॉक्टरकडे आढळून आले.

या वेळी त्यांच्याकडून औषध व इतर वस्तू असा ३३ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वैद्यकीय परवाना नसलेल्या डॉक्टरांमध्ये खळबळ माजली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार लखन राठोड, जमादार अविनाश मुंडे आदी करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button