नागपूर : अल्‍पवयीन मुलीवर बलात्कार, पोलीस उपनिरीक्षकाला अटक | पुढारी

नागपूर : अल्‍पवयीन मुलीवर बलात्कार, पोलीस उपनिरीक्षकाला अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नक्षल प्रतिबंधक कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षकाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (वय ३५) हे असे अटक करण्‍यात आलेल्‍या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. (Vidarbha)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. आरोपी नितवने आणि पीडित मुलीच्या घरच्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. पीडितेचे वडील खासगी कंपनीत नाेकरी करतात. घरोब्याचे संबंध असल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी प्रदीपकुमार नितवने याला मुलीकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. ही मुलगी पेईंग गेस्ट म्हणून राहत असल्याने नितवने याचे तिच्याशीही चांगले संबंध होते.

घटनेच्या दिवशी नितवने याने पीडित मुलीला फोन करून बाहेर फिरायला जाऊ, असे सांगितले. नितवने ओळखीचे असल्याने पीडित मुलीच्या घरमालकांनीही आक्षेप घेतला नाही. नितवने पीडित मुलीला अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे घेऊन गेला. तिथे तिला गुंगीची गोळी देऊन बेशुद्ध केले. दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. नागपुरात परत आल्यावर पीडित मुलीने आई-वडीलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. बर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३७६ (२), (एफ), ३२८ नुसार पाेलीस उपनिरीक्षक प्रदीपकुमार नितवने याच्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याला रविवारी अटक करून रविवारीच न्यायालयात हजर करण्यात आले. प्रदीपकुमार नितवने याला पाेलीस काेठडी सुनावण्‍यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button