अकोल्याचे तापमान ४४ अंश सेल्सियसवर | पुढारी

अकोल्याचे तापमान ४४ अंश सेल्सियसवर

अकोला ; पुढारी वृत्‍तसेवा अकोल्याच्या तापमानात रविवारच्या तुलनेत एका अंशाने भर पडली आणि आज (सोमवार) 44.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा सततचा तडाखा नागरिकांना असह्य होत आहे. सूर्योदयानंतर या भागात तापमान वाढू लागते. दुपारी 12 वाजल्‍या नंतर तर सूर्याची प्रखरता आणखी जाणवू लागते. गेल्या काही दिवसांपासून 43 अंशाच्या आसपास राहिलेले तापमान आता 44 अंशाच्या घरात पोहोचले आहे. तीन दिवसांपासून अकोला विदर्भात टॉपवर आहे. जनजीवनावर वाढत्या तापमानाचा परिणाम दिसत आहे.

यंदाचा उन्हाळा चांगलाच ग्रासतो आहे. मार्च महिन्यातील तापमानाने यंदा उच्चांक गाठला आणि एप्रिलच्या सुरूवातीपासूनच वातावरण तापू लागले. उन्हाच्या झळा सुसह्य व्हाव्या यासाठी नागरिक विविध उपाय योजत आहेत. कूलर शिवाय घरात राहण्याची सोय राहिलेली नाही.

सतत तिस-या दिवशी अकोला टॉपवर

उन्हाच्या बाबतीत अकोला विदर्भात टॉपवर राहिला. शनिवारी 43.5 अंश सेल्सियस, रविवारी 44.0 तर सोमवारी 44.01 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तिन्ही दिवस अकोल्याच्या तापमानाने उच्चांक गाठला. सोमवारी चंद्रपूर, यवतमाळच्या तुलनेत अकोल्याचे तापमान खूप अधिक होते.

Back to top button