डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली स्टेशन समोरील धोकादायक लक्ष्मी निवास इमारतीला आज आग लागली. पूर्वेकडील स्टेशन जवळील पाटकर रोडवरील शकुंतला वामन पाटील आणि रातीलाल शहा यांच्या मालकी ही 'लक्ष्मी निवास' इमारत आहे. गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ही इमारत तळमजला अधिक तीन माळ्याची आहे. आगीच कारण अद्याप समजले नसून या इमारतीच्या तळमजल्यावरील चार दुकाने सुरू होती. आग लागल्याचे लक्षात येताच त्या चारी दुकानदारांची पळापळ झाली.
या इमारतीत प्रकाश डेअरी फॉर्म, दुबे स्नॅक्स सेंटर, भूमी कलेक्शन, रॉयल स्टील सेंटर या दुकानांतून व्यवहार सुरू होता. या धोकादायक इमारतीत लाकडाचे सेंटरिंग तसेच फेरीवाल्या सामानांचे गोडाऊन असल्याची माहिती समोर येत आहे.
लक्ष्मी निवास इमारतीस आग लागल्याचे समजताच पूर्व व पश्चिम विभागातील अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळवले. आग आणि धुराचा लोट वाढत असतानाच जवानानी आग आटोक्यात आणली. यावेळी 'फ' प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांच्यासह पालिका कर्मचारी, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.
स्टेशनजवळच ही घटना घडल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक सहायक पोलिस निरीक्षक राजश्री शिंदे यांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळीधाव घेतली. तर सदर ठिकाणी रिक्षा थांबा असल्याने रिक्षा दुसऱ्या ठिकाणी गेल्या. तर बघ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये आगीचे दृश्य टिपले.