काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदासाठी कमलनाथ यांचे नाव आघाडीवर; सोनिया गांधींची घेतली भेट | पुढारी

काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदासाठी कमलनाथ यांचे नाव आघाडीवर; सोनिया गांधींची घेतली भेट

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस नेते कमलनाथ आणि सोनिया गांधी यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर वर्णी लागू शकते. त्यांचे नाव काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अग्रभागी आहे.

अधिक वाचा :

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर होईल. सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्यामुळे नवीन अध्यक्ष पदाचा शोध सुरू आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी गेला काही काळ राजकारणात सक्रिय नसल्याचे चित्र आहे.

बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारही केला नाही.

आज झालेल्या सोनिया-कमलनाथ यांच्यातील बैठकीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत युतीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात सक्रिय भूमिका निभावणार्‍या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनीही या बैठकीला हजेरी लावली.

अधिक वाचा :

यूपीमध्ये कमलनाथ यांचे चांगले संबंध…

राज्यात विरोधकांची भूमिका बजावणा-या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षासमवेत काँग्रेस निवडणुका लढविण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर कमलनाथ यांचे दोन्ही पक्षांशी असलेले संबंध चांगले आहेत.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीतच काँग्रेस आणि सपा एकत्र निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते. पण त्यांच्या आघाडीचा पराभव झाला. भाजपने बहुमत मिळवत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले.

२०१७ च्या मध्ये आघाडीचे गणित काय होते?

पाच वर्षांपूर्वी युपीच्या विधानसभा निवडणूकीत एकत्र आलेल्या काँग्रेस आणि सपा यांच्यात राज्यातील ४०३ जागांच्या वाटणीबाबत बराच काळ चर्चा सुरू होती. अखेर सपाने २९८ जागांवर लढण्याचा निर्णय घेतला. तर, १०५ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या.

त्यातच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर सपा आणि मायावतींच्या बसपामध्ये बिनसले आहे. त्या काळात झालेल्या आघाडीने राज्यातील ८० पैकी १५ जागा जिंकल्या. दरम्यान, दोन्ही पक्ष प्रमुखांनी पुन्हा एकत्र येत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा :

Back to top button