अ‍ॅलर्जी कशामुळे होते आणि त्यावर काय कराल उपाय?

अ‍ॅलर्जी कशामुळे होते आणि त्यावर काय कराल उपाय?
Published on
Updated on

आपल्या नेहमीच्या बोलण्यात अ‍ॅलर्जी हा शब्द इतक्या सहजपणे वापरला जातो की, 'एखाद्या गोष्टीचा आपल्याला होणारा त्रास' असा त्याचा सहजसोपा अर्थ चटकन समजतो. एखाद्या पदार्थाविषयी शरीराची असलेली अतिसंवेदनशीलता किंवा वावडे म्हणजे अ‍ॅलर्जी.

वैद्यकीय परिभाषेत, एखादा बाह्य पदार्थ शरीरात किंवा त्वचेवर आला, तर सर्वसामान्यपणे न होणारी विशिष्ट किंवा विपरीत प्रतिक्रिया जेव्हा एखाद्या व्यक्‍तीच्या बाबतीत होते, तेव्हा त्या अवस्थेला 'अ‍ॅलर्जी' असे म्हणतात.

ज्या बाह्य पदार्थांमुळे अ‍ॅलर्जी होते त्यांना अ‍ॅलर्जन किंवा प्रतिजन असे म्हणतात. हे पदार्थ बहुधा प्रथिन किंवा संयोजित पिष्टमय स्वरूपाचे असतात.

कोणताही बाह्य पदार्थ शरीरात आला तर, आपली रोग प्रतिकारक्षम यंत्रणा त्याला निरुपद्रवी करून टाकते. शरीरात जेव्हा पहिल्यांदा एखादा बाह्य पदार्थ प्रवेश करतो तेव्हा आपल्या रोग प्रतिकारक्षम यंत्रणेमार्फत या बाह्य पदार्थाविरुद्ध प्रतिपिंडे तयार केली जातात.

प्रत्येक विशिष्ट बाह्य पदार्थांसाठी विशिष्ट प्रतिपिंड निर्माण होते. थोडक्यात, लाखो प्रकारची प्रतिपिंडे आपल्या शरीरात तयार होऊ शकतात. जेव्हा हाच बाह्य पदार्थ शरीरात दुसर्‍यांदा प्रवेश करतो, तेव्हा या बाह्य पदार्थाला म्हणजेच प्रतिजनाला नामोहरम करण्यासाठी प्रतिपिंडे त्यावर आक्रमण करतात आणि 'प्रतिजन – प्रतिपिंड' प्रक्रिया होते.

काही व्यक्‍तींंमध्ये ही क्रिया विपरीत झाल्यामुळे 'प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया' सरळमार्गी न होता शरीरातील पेशी त्या विशिष्ट प्रतिजनांसंबंधी अतिसंवेदनशील झाल्याने रक्‍तात विविध प्रकारचे रासायनिक घटक सोडले जातात. त्यांचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे प्रतिजनाचा शरीरात प्रवेश झाल्यावर विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. याला अ‍ॅलर्जी असे म्हणतात.

अ‍ॅलर्जी कोणकोणत्या पदार्थांमुळे किंवा कोणकोणत्या परिस्थितीत होते?

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. हवेत गारवा आहे. बाहेर पाऊस आहे. कधीकधी ऊनही आहे. काही ठिकाणी घरात कोंदटपणा निर्माण झाला आहे. या हवाबदलाच्या काळात अनेकांना अ‍ॅलर्जीचा त्रास संभवतो.

वातावरणात वाढलेले परागकण बाहेरील आणि घरातील धूर किंवा धूळ हे महत्त्वाचे घटक आहेत.  बाहेरील धुरात सल्फर डाय ऑक्साईडसारखे धोकादायक वायू, कार्बन आणि इतर अनेक प्रकारचे सूक्ष्म कण असतात.

घरात देवपूजेसाठी वापरली जाणारी अगरबत्ती, तसेच डास पळविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मॅटस् किंवा अगरबत्त्यांचा धूर धोकादायक असतो. ग्रामीण भागात चुलीचा धूर असतो.

बिडी-सिगारेटमुळे निर्माण होणारा धूरदेखील त्रासदायक असतो. घरातल्या धुळीतील सूक्ष्म कीटक अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत असतात. विशेषत: अनेक दिवस स्वच्छ न केलेल्या अंथरुणावर किंवा कापसाच्या गादीच्या बोंडातील धुळीत हे सूक्ष्म कीटक असतात.

वेगवेगळ्या प्रकारचा वास, रंग, परफ्युम्स, डिओडरंटस्, अत्तर, वेगवेगळे खाद्यपदार्थ, थंड पेये, काही विशिष्ट प्रकारची औषधे अशा अनेक पदार्थांमुळे अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. घरातील पाळीव प्राणी उदा. कुत्रा, मांजर, कबुतरे, कोंबड्या यांच्यामुळेही अ‍ॅलर्जीचा त्रास होतो.

सर्दी, शिंका, नाक गळणे, नाकात खाज येणे, नाक लालसर होणे, तोंडात वरच्या भागात टाळूला खाज येणे, घशात खाज येणे, अशी अ‍ॅलर्जी्च्या सर्दीची लक्षणे असतात. वातावरणातील, जागेतील किंवा खाण्यातील बदल हे याला कारणीभूत असतात. अ‍ॅलर्जी ही अनुवंशिक असते.

सर्दी दोन प्रकारची असते. एक अ‍ॅलर्जीची आणि दुसरी विषाणूजन्य. कोरोनाच्या या काळात अनेकजण सर्दी झाली की, घाबरून जातात; पण सर्दीला कारणीभूत अनेक विषाणू असतात.

ज्या व्यक्‍तीला दरवर्षी विशिष्ट वातावरणात सर्दीचा त्रास होतो, त्याच वातावरणात सर्दी झाली असेल, तर कोरोनाची शक्यता कमी. कोरोनामध्ये कमी-अधिक ताप, अंगदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे, जुलाब इत्यादी लक्षणे असतात. अ‍ॅलर्जीच्या सर्दीत शरीराच्या इतर भागांत लक्षणे नसतात.

सर्दीची अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्‍तींना भविष्यात दम्याचा त्रास होऊ शकतो. दमा म्हणजे फुफ्फुसातील अ‍ॅलर्जी म्हणूया. या व्यक्‍तींंना दम लागणे, छातीतून घरघर आवाज येणे, कोरडा खोकला येणे, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे, कोंडल्यासारखे वाटणे, श्‍वास अपुरा पडणे अशी लक्षणे दिसतात.

जेव्हा डोळ्यांवर परिणाम होतो, तेव्हा डोळे खाजवणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल होणे अशा तक्रारी आढळतात. त्वचेच्या अ‍ॅलर्जीची वेगवेगळी लक्षणे आढळून येतात.

कुटुंबात अ‍ॅलर्जीचा इतिहास असेल तर, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्या पदार्थांची अ‍ॅलर्जी आहे, ते पदार्थ टाळणे हा उत्तम उपाय; पण काही व्यक्‍तींना काही कालावधीसाठी औषधोपचार घेणे आवश्यक असते.

अर्थात, हे उपचारतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे कधीही चांगले. साध्या सर्दीवर उपचार कशाला असे अनेकांचे म्हणणे असते; पण सर्दीकडे दुर्लक्ष केल्यास त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो.

सर्दीचे कारण अन्य काहीही असू शकते किंवा सर्दीशी निगडीत इतर विकार असू शकतात. संधिवात, एसएलई, हे तसे म्हटले तर एक प्रकारच्या अ‍ॅलर्जीच्या कारणांमुळे निर्माण झालेले विकार असतात.

त्यामुळे केवळ अ‍ॅलर्जीचे कारण शोधले; पण त्रास कमी होत नसेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाणे आणि 'काट्याचा नायटा' होण्यापूर्वी वेळीच अ‍ॅलर्जीचा 'काटा' काढणे शहाणपणाचे ठरते.

डॉ. अनिल मडके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news