नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकांच्या मालिकेने चांगलीच चर्चा रंगली. या बैठकीच्या मालिकेनंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली.
दरम्यान, या सलगपणे होत असलेल्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना पुढील राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगालमधील रणसंग्राम पार पडल्यानंतर प्रशांत किशोर आणि शरद पवार तीनदा भेटले आहेत. यामधील एक बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या उपस्थितीत झाली आहे.
अधिक वाचा
ही बैठक भाजपविरोधात आगामी विधानसभा आणि २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या एकजुटीसाठी झाली असल्याचेही बोलले जात आहे.
तथापि या सर्व शक्यता प्रशांत किशोर यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नसल्याचे म्हटले होते.
मात्र, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी बांधलेल्या आडाख्यानुसार राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडे पुरेशी मते होऊ शकतात.
मात्र त्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनाईक यांना विरोधकांना सहकार्य करावे लागेल.
अधिक वाचा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी नवीन पटनाईक आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची अलीकडेच भेट घेतली होती.
विरोधकांची एकजूट भाजपची डोकेदुखी वाढवू शकतात असा अंदाज प्रशांत किशोर यांना वाटतो.
प्रशांत किशोर यांची जमेची बाजू पाहिल्यास त्यांचे ममता बॅनर्जी, जगन रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, उद्धव ठाकरे यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत. मात्र यामध्ये काँग्रेसची आवश्यकता असेल.
महाराष्ट्र आणि तमिळनाडूची मते पवारांच्या बाजूने येऊ शकतात. मात्र, नवीन पटनाईक यांची भूमिका निश्चित नाही.
प्रशांत किशोर आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक ऑनलाईन झाली.
प्रियांका गांधी यांनी आपला लखनौ दौरा स्थगित करून या बैठकीत सहभाग घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला कृती आराखडा सादर केला आहे.
https://youtu.be/3ZhVoZH7vfI