Thane Lok Sabha Election : नजीब मुल्ला यांचे दाउदसोबत संबंध?; चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो! | पुढारी

Thane Lok Sabha Election : नजीब मुल्ला यांचे दाउदसोबत संबंध?; चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो!

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत संबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसे काय सांगितले होते आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हॉस्पीटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे?, याचे उत्तर परांजपे-मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी आज पत्रकार परिषेद घेऊन वाभाडे काढले. ( Thane Lok Sabha Election )

सुहास देसाई म्हणाले की, आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी पैसे उकळले नाहीत. पण, पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे संबंध ठाण्याला माहित आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इसमाला कोणी दिली होती? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्कटाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका.

आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा ! कार्यालयातील खाणं-पिणं, टिपटॉपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे. तेव्हा याच आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, कळव्यातील मैदानामुळे ठाण्यातील दोन्ही राष्ट्रवादीत तूंबळ जुंपली असल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. ( Thane Lok Sabha Election )

Back to top button