तुम्ही पण नकली तूप खाता का? शुद्ध देशी तूप कसे ओळखावे? | पुढारी

तुम्ही पण नकली तूप खाता का? शुद्ध देशी तूप कसे ओळखावे?

ठाणे : नरेंद्र राठोड : नववर्षाच्या सुरवातीलाच भिवंडीतील जनारावरांच्या चरबीपासून नकली तुप बनवण्याचा कारखाना स्थानिक महापालिका प्रशासनाने छापा टाकून उद्ध्वस्त केला. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. या कारखान्यात बनवण्यात येणारे नकली तूप ग्रामीण भागातील दुकानांवर तसेच उपहारगृह, खानावळ यांना पुरवण्यात येत होसे, असे देखील समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावरचे उपहारगृह, अनधिकृत खानावळीमध्ये बनणारे पदार्थ आणि ग्रामीण भागात विक्री होणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, कळत नकळत नकली तूप खाण्याचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात असा इशारा आहारतज्ज देतात. नकली तूप खाण्यामुळे शरीरात दूषित फॅट झपाटयाने वाढून कोलेस्टेरॉलची मात्र वाढते. तसेच हार्ट अटॅक, नस ब्लॉकेज, रक्तप्रवाहात व्याथी, पोटदुखी असे गंभीर आजार होऊ शकतात. अशी माहिती फिजिशियन डॉ. मुकुंद दोषी यांनी दिली. सध्या बाजारात आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या अनेक पदार्थांची भेसळ करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या भेसळयुक्त पदार्थामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, मात्र सगळ्यात जास्त भीती असते ती म्हणजे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची. स्थानिक प्रशासन व अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवेळी अशाप्रकारच्या भेसळयुक्त वस्तूंवर, गोदामांवर कारवाई करत भेसळ करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण याला न जुमानता अनेक व्यापारी, दुकानदार भेसळ करतात. या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भिवंडीत बनावट तूप वनविण्याचा कारखाना महापालिका पथकाने उ‌द्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त केले.

खाडीकिनारी असलेल्या एका कारखान्यात जनावरांची चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवले जात होते. घटनास्थळावर तूप बनविण्याच्या भट्टीवरील कढई, बनावट तुपाचे डब्बे, जनावरांची चरबी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. छोट्या मोठ्या खानावळी, उपहारगृह, व्यावसायीक आणि ग्रामीण भागात त्याची विक्री होत असल्याचे या करवाईतून उघड झाले आहे. या प्रकरणी भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नकली कसे ओळखावे?

शुद्ध देशी तूप तपासण्याचा एक चांगला मार्ग म्हणाजे ते हातावर घेऊन तपासणे. तुमच्या उथळहातावर एक चमचा तूप घ्या आणि ते वितळेपर्यंत काही वेळ थांबा, तूप वितळायला लागले तर शुद्ध आहे, तसेच राहिले तर भेसळयुक्त आहे असे ओळखावे.
गॅसवर पॅन मध्ये एक चमचा तूप गरम केल्यावर जर तूप लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंगाचे झाले तर ते शुद्ध तूप आहे. जर ते वितळण्यास वेळ लागला आणि फिकट पिवळा झाला तर ते भेसळयुक्त आहे असे ओळखावे. या तुपामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न उभे राहिले आहेत. चरबी खाणे हे शरीराला नेहमीच घातक ठरते. त्यात जनावरांच्या चरबीमध्ये असलेले घटक मानवी शरीराला घातक ठरतात. यातून हार्ट अटॅक, रक्तप्रवाहात दबाव, पोटदुखी व पोटाचे विकार होऊ शकतात, असा इशारा आहार तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे या तूपाच्या दुष्परिणामांवर प्रकाशझोत पडला आहे.

असे बनते नकली तूप

एक किलो नकली तूप बनवण्यासाठी ५०० ग्रॅम जनावरांची चरबी, ३०० ग्रॅम रिफाईड ऑईल, २०० ग्रॅम असली तूप आदी पदार्थ एकत्र करून त्यास मोठ्या कढईत गरम करण्यात येते. त्यानंतर या तुपात शुद्ध तुपासारखे सुगंध देणारे एसेंस केमिकल मिसळून डब्यात पॅक केले जाते. त्यानंतर हे डब्ये विक्रीसाठी पाठवले जातात, अशी माहिती अन्न व औषध विभागाच्या सूत्रांनी दिली. रस्त्यावरचे उपहारगृह, स्वस्त हॉटेल्स आदी ठिकाणी अशा तुपापासून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात, तर ग्रामीण भागात देखील अशा नकली तुपाची विक्री केली जाते.

अशी करा तक्रार

कुठेही भेसळयुक्त पदार्थ विक्री होत असेल तर त्याची तक्रार औषध प्रशासनविभागाकडे अथवा स्थानिक महापालिका प्रशासनाकडे करता येते. एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर अथवा इमेलने देखील भेसळयुक्त पदार्थाची तक्रार करता येते.

ठळक मुद्दे…

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हासह राज्यात खळबळ उडाली असून या घटनेनंतर नकली तूप सर्रास विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे, तर दुसरीकडे स्वस्त आणि नकली तुपामुळे नागरिकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वात्रीच्या ठिकाणावरुन आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच तूप खरेदी करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, नकली तूप खाण्यामुळे अनेक शारीरिक व्याधी होऊ शकतात असे डॉक्टर व आहार तज्ञ सांगतात. भेसळयुक्त अथवा नकली तूप खाल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाहून दुषित फॅट तयार होते. त्यामुळे वजन वाढणे, स्थूलपणा असे आजार होतात.

हेही वाचा : 

Back to top button