डोंबिवली : ए चोरा, हाक मारणे पडले महागात: चप्पल विक्रेत्याला भर बाजारात बेदम मारहाण | पुढारी

डोंबिवली : ए चोरा, हाक मारणे पडले महागात: चप्पल विक्रेत्याला भर बाजारात बेदम मारहाण

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या फुटपाथवरील चप्पल विक्रेत्याने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला  लाडाने ए चोरा…म्हणून हाक मारली. त्याचा त्या व्यक्तीला भयंकर राग आला. त्याने रागाच्या भरात चप्पल विक्रेत्याला बेदम मारहाण केली. भर बाजारात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

या घटनेनंतर सुनील भागीरथ मंडराई (वय 45) या टपरीधारक चप्पल विक्रेत्याने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. हा व्यावसायिक पूर्वेकडील सावरकर रोडला असलेल्या रोहिदास वाडीत राहतो. त्याने मुकेश नमने  (वय 35) या मारहाण करणाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार सुनील मंडराई यांचा डोंबिवली पूर्वेतील फडके रोडला असलेल्या शामराव विठ्ठल बँकेसमोरील पदपथावर चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी संध्याकाळी सुनील दुकानात चप्पल विक्रीसाठी बसले होते. इतक्यात त्यांच्या समोरील रस्त्यावरुन मुकेश नमने चालला होता. त्याला पाहून सुनील यांनी ए चोरा, अशी हाक मारली. वर्दळ असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर पादचाऱ्यांसमोर सुनील याने मुकेश याला चोरा म्हणून हाक मारली. हे ऐकून पादचारी मुकेशकडे पाहू लागले. त्याला ओशाळल्या सारखे झाले. सुनीलने आपणास चोरा हाक मारुन आपली बदनामी केल्याचा मुकेशला राग आला. त्याने रागाच्या भरात सुनीलला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुनीलच्या पायाचे हाड तुटले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात फौजदार केशव हासगुळे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button