ठाणे : गतिमंद मुलीची पित्याकडूनच हत्या; मानपाडा हादरले | पुढारी

ठाणे : गतिमंद मुलीची पित्याकडूनच हत्या; मानपाडा हादरले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : लवलीचा काहीच उपयोग नाही, तिला संपवून टाकतो, असे म्हणत नराधम पित्याने आपल्या पोटच्या गतिमंद चिमुरडीला संपवले. या हत्येने डोंबिवलीजवळचा मानपाडा तथा माणगाव परिसर हादरून गेला आहे. मुलीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या मनोज कुमार रामप्रसाद अग्रहारी (३८) या निर्दयी पित्याला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.

कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या मानपाडा (माणगाव) गावातील हरी म्हात्रे चाळीत अग्रहारी कुटुंब ३ मुलींसह राहते. मनोज डोंबिवलीतील एका किराणा दुकानात नोकरी करतो. त्याला दारूचे भयंकर व्यसन आहे. पत्नी लीलावती आणि तिच्या दोन मोठ्या मुली मजुरीची कामे करतात. १० वर्षाची मुलगी लवली ही जन्मापासून गतिमंद असल्याने घरीच असायची. तिच्यावरून मनोज आणि लीलावतीमध्ये सतत वाद व्हायचे. दारू ढोसून आला की मनोज पत्नीसह मुलींना मारहाण करायचा. हा त्याचा नित्यक्रम झाला होता.
लवलीवर उपचारही सुरू होते. मात्र कोणताच फायदा होत नव्हता. उपचारांचा खर्च देखील वादाचा विषय झाला होता. मनोज कधी कधी प्रचंड संतापून जायचा. लवलीचा जगून काही उपयोग नाही. तिला संपवून टाकू, अशी विधाने तो करायचा. त्याच्या मनात लवलीबद्दल प्रचंड सल होता, त्यातून हे विधान त्याने अखेर प्रत्यक्षात उतरवले.

पित्याच्या भीतीने लवलीही आईला एक क्षणही सोडत नव्हती. पण २४ सप्टेंबर रोजी रविवारी संध्याकाळी लीलावती काही कामानिमित्ताने बाहेर गेली असताना दारूच्या नशेत घरी आलेल्या मनोजने संधी साधली आणि घरात एकटीच असलेल्या लवलीची गळा दाबून हत्या करून लीलावती काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लीलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा. मुलगी मयत झाली आहे, असा निरोप दिला आणि पसार झाला.

Back to top button