ठाणे : मराठीचा अवमान करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसैनिकांचा दम | पुढारी

ठाणे : मराठीचा अवमान करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसैनिकांचा दम

डोंबिवली; बजरंग वाळुंज : कल्याणच्या रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर एका परप्रांतीय फेरीवाल्याकडून सामान विकत घेत असताना त्या फेरीवाल्याने मराठी ग्राहकाला तुम्ही मराठी लोक असेच असतात, अशा उपरोधिक शब्दांत मराठी भाषेला डिवचले. यावर तु मला बोल पण, माझ्या मराठी भाषेला काही बोलू नकोस, असे ग्राहक तरुणाने फेरीवाल्याला बजावले. या घटनेनंतर झालेल्या वादविवादी दरम्यान घटनास्थळी मनसैनिक दाखल झाले. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या या उन्मत्त परप्रांतीय फेरीवाल्यांची मनसैनिकांनी यथेच्छ धुलाई करत धिंड काढली. हा सर्व प्रकार रविवारी (दि. १) दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेतील स्कायवाॅकवर घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समस्त मराठी भाषिक तथा मराठीप्रेमी कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या संदर्भात मिळालेली माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वासिंद भागात राहणारा एक मराठी भाषिक तरूण कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. काम आटोपल्यानंतर तो कल्याण रेल्वे स्थानकातून आसनगाव लोकलने घरी चालला होता. कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर एका फेरीवाल्याकडून या तरुणाने पैसे देऊन काही सामान खरेदी केले. त्यातील वस्तू खराब वाटल्याने तरुणाने ती परत करुन फेरीवाल्याकडून पैसे मागितले. मात्र फेरीवाल्याने पैसे देण्यास नकार दिला. वस्तू खराब आहे म्हणून ती परत केली. तू माझे पैसे परत कर, असा या तरूणाने तगादा लावला. यावर परप्रांतीय फेरीवाल्याने तरुणाला उद्देशून मराठी लोक असेच असतात, अशा उपरोधिक शब्दांत टिका-टिपण्णी केली. तुम्ही मराठीचा उल्लेख येथे कशासाठी करता? तु मला बोल, पण मराठीचा अवमान करू नकोस, अशा शब्दांत तरूणाने झाडले. हे पाहून अन्य परप्रांतीय फेरीवाले या तरुणाभोवती जमा होऊन हुल्लडबाजी करू लागले.

मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या त्या फेरीवाल्याचा खरेदीदार तरुणाला राग आला. इतर फेरीवाले तरुणाशी वाद घालत असताना तरुणाने मी मनसैनिकांना बोलवतो, असा इशारा दिला. त्यावेळी तु कुणालाही बोलव जा, ते आमचे काही वाकडे करू शकत नाहीत, असा उर्मट उलट इशारा फेरीवाल्याने दिला. तरुणाने कल्याण पूर्वेतील मनसेच्या शाखेत जाऊन घडलेला प्रकार उपस्थित राजसैनिकांना सांगितला. शाखेतील चार ते पाच मनसैनिक तात्काळ रेल्वे स्कायवाॅकवर पोहोचले. हुज्जत घालणाऱ्या फेरीवाल्यासह तेथे मग्रुरी करणाऱ्या अन्य फेरीवाल्यांना येथे येऊन धंदा करता आणि उलट आम्हालाच शिकवता असे बोलत मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या फेरीवाल्यांना यथेच्छ बदडून काढले.

मनसैनिकांचा रुद्रावतार पाहून स्कायवाॅकवरील इतर फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला. काही वेळाने रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आले. मनसैनिकांनी फेरीवाल्यांना पकडून जवानांच्या ताब्यात दिले. या प्रकारामुळे स्कायवाॅकवर काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

Back to top button