‘लिव्ह इन’मधील 8 साथीदारांनी जोडीदारास संपवले | पुढारी

‘लिव्ह इन’मधील 8 साथीदारांनी जोडीदारास संपवले

ठाणे; नरेंद्र राठोड : गेल्या काही वर्षांत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील विकोपाला जाणारा वाद देखील जीवघेणा ठरतोय. ठाणे शहर आयुक्तालयात मागील पाच महिन्यांत एकूण 41 खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 35 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मीरा रोड येथे राहणार्‍या 56 वर्षीय मनोज साने याने त्याच्यासोबत तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या 32 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच समोर आली.

अशीच घटना काही महिन्यांपूर्वी भिवंडीत घडली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या 24 वर्षीय तरुणीची तिच्याच साथीदाराने गळा दाबून हत्या केल्यानंतर रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह गुपचूप गावी नेण्याचा आरोपीने प्रयत्न होता. मात्र, भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातून ताब्यात घेत अटक केली होती. लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर हा वाद एके दिवशी इतका विकोपाला गेला की, या वादानंतर तरुणीची हत्या तिच्याच साथीदाराने केली. अशाच प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या महिला-पुरुषांचा वाद जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या मते कायदेशीर

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाची गाठ न बांधता एकमेकांच्या संमतीने एकत्र राहणे. लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्यास सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिलेली आहे. दोन प्रौढ व्यक्ती लग्न न करताही स्वतःच्या इच्छेने कौटुंबिक वैवाहिक जीवन जगू शकतात. लिव्ह इन रिलेशनशिपलाही विधिमंडळही वैध मानते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना दोघांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे नमूद करण्यात आले आहे. रिलेशनशिपमध्ये असताना मुलाचा जन्म झाला तर ते नाते लिव्ह इन मानले जाईल. शारीरिक संबंध आणि मूल होणे हे दोघांच्याही इच्छेवर अवलंबून राहील, असेदेखील कायदेशीर तत्त्वात नमूद आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून काही लिव्ह इन रिलेशनशिप कायदे करण्यात आले आहेत.

दोन व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहात असतील आणि नंतर त्यांचे नाते बिघडत असेल, तर बलात्काराचा आरोप करणे योग्य नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवलाई संपली की होतो पिच्छा सोडविण्याचा प्रयत्न

अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी अनेक जोडप्यांमध्ये नसते. अनेकदा आपल्या पार्टनरच्या काही सवयी एकमेकांना आवडत नाहीत आणि छोट्या-मोठ्या गोष्टीतून वाद होतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की, त्यातून गंभीर गुन्हे देखील घडतात, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2020 व 2021 या दोन वर्षात देशभरात महिलांच्या घरगुती व जोडीदाराकडून होणार्‍या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या हिंसाचारात बळी पडणार्‍या महिलांमध्ये 11 टक्के संख्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या महिलांची आहे.

Back to top button