वसईमध्ये एकशे एक रुपयात ६० जोडप्यांचे होणार शुभमंगल | पुढारी

वसईमध्ये एकशे एक रुपयात ६० जोडप्यांचे होणार शुभमंगल

खानिवडे : वसईतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जूचंद्राच्या आई चण्डिका माता न्यासाने कोरोनामुळे मागील दोन वर्षे खंडित झालेला सामुदायिक विवाह सोहळा पुन्हा सुरू केल्याने इच्छुक वधू वरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. केवळ एकशे एक रुपया शुल्काने विवाह संपन्न होत असल्याने उपवर अनेक तरुण तरुणी या विवाह सोहळ्याची वाट पहात असतात. आज म्हणजेच २मे रोजी या सोहळ्यात एकूण ६० जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.

सध्याच्या महागाईच्या काळात गोरगरीब नागरिकांसाठी लग्न ही आवाक्याबाहेरची बाब ठरली आहे. लग्नात लागणारे साहित्य, सोने, जेवण, मानपान, कन्यादान तसेच अन्य लग्नपयोगी संस्कार महागल्याने लग्न म्हणजे खर्चच खर्च अशी सर्वसामान्यांची धारणा झाली आहे. यामुळे वसई- विरारमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी १०१ रूपयांत सामुदायिक विवाहसोहळा ही अभिनव कल्पना पुढे आली. गेल्या अनेक वर्षांपासून वसईत श्री चंडिकादेवी न्यासाच्या माध्यमातून १०१ रूपयांत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यात येत आहेत.

यंदाही अशापद्धतीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण ६० जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. परिसरातील गोरगरीब नागरिकांसाठी हा विवाहसोहळा कमी खर्चात होत असल्याने दरवर्षी मे महिन्यात विवाह जमलेले वधु-वराकडील मंडळी या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होत असतात. आज ६० जोडपी मंगल बंधनात अडकणार आहेत.

Back to top button