सिद्धिविनायकासाठी ऑनलाईन लाडू घेणे आले अंगलट | पुढारी

सिद्धिविनायकासाठी ऑनलाईन लाडू घेणे आले अंगलट

ठाणे : पुढारी डेस्क : आजारपणातून बरे झाल्यानंतर सिद्धीविनायकासाठी ऑनलाईन लाडूचा प्रसाद विकत घेणे कोलकात्तातील उद्योगपतीच्या अंगलट आले. मात्र काही तासांत मुंबईच्या माटुंगा पोलिसांनी प्रसंगावधान राखत भामट्याने पळवलेले १ लाख ७० हजार ६८ रुपये उद्योजकाच्या क्रेडिट कार्डच्या खात्यात जमा केले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

कोलकातातील उद्योगपती उपचारासाठी मुंबईत आले होते. आजारपणातून बरे झाल्याने त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्याचे ठरवले. तत्- पूर्वी माटुंग्यातील नामांकित मिठाई दुकानाचा नंबर गुगलवर सर्च केला असता उद्योगपतीला वेब पेजवर दुकानाचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावर संपर्क साधून उद्योजकाने प्रसादासाठी लाडू बूक केले. सदर लाडूचे पेमेंट करण्यासाठी उद्योगपतीच्या मोबाईलवर मेसेजद्वारे लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करून उद्योजकाने क्रेडिट कार्डद्वारे लाडूचे २ हजार रुपये बिल पेड केले. दरम्यान, काही वेळात त्याच्या क्रेडिट कार्डमधून १ लाख ७० हजार ६८ रुपयांची शॉपिंग झाल्याचा एसएमएस आला. सदर मेसेज पहाताच ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उद्योजकाच्या लक्षात आले. उद्योजकाने तत्काळ माटुंगा पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यानुसार वपोनि दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे प्रकटीकरणचे सपोनि दिगंबर पगार, अंमलदार संतोष पवार, मंगेश जऱ्हाड यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता उद्योजकाच्या खात्यातून ट्रान्सफर झालेल्या पैशांतून नवी दिल्लीत ऑनलाईन आयफोन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. सदर मोबाईलची ऑडर रद्द करून १ लाख ७० हजार ६८ रुपये उद्योजकाच्या क्रेडिट कार्डमध्ये पुन्हा जमा करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले.

गुगलवर सर्च करताना सावधान

भामट्यांनी गुगलवर नामांकित कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटसमान दिसणाऱ्या बोगस वेबसाईट तयार केल्या आहेत. त्यावर मोबाइल नंबर अपलोड केले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग, कुठल्याही आस्थापनेचा नंबर सर्च करताना सावध रहा. खात्री पटल्याशिवाय व्यवहार करू नका, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Back to top button