ऑनलाईन रुमाल खरेदीपायी महिलेने गमावले ९८ हजार | पुढारी

ऑनलाईन रुमाल खरेदीपायी महिलेने गमावले ९८ हजार

ठाणे : संतोष बिचकुले : ऑनलाईन लुटण्यासाठी भामट्यांनी सोशल मीडियावर जाळे पसरवल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ठाणे शहरात ऑनलाईन रुमाल, तोरण विकत घेणाऱ्या महिलेला बोगस आर्मी अधिकाऱ्याने व्हॉट्सअॅप क्यूआर कोड पाठवून ९८ हजार ५०० रुपये लुटले. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.

ठाणे शहरातील वागळे स्टेट परिसरात राहणारी ३१ वर्षीय महिला फेसबूक सर्च करत होती. त्यावेळी तिला एका पेजवर विनकाम केलेले रुमाल, तोरण दिसले. त्या पोस्ट महिलेने लाईक केले. काही वेळात महिलेला मेसेज आला. स्वस्त दरात सदर वस्तू खरेदी करण्याचे आमिष दाखवले. तसेच महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी आर्मी अधिकारी असल्याचे सांगून महिलेचा व्हॉट्सअॅप नंबर मिळवला. त्या क्रमांकावर मनजित सिंग या नावाचे आर्मी अधिकाऱ्याचे ओळखपत्र पाठवले. ओळखपत्र पाहून विनकाम केलेल्या वस्तू खरेदीसाठी महिलेने होकार दिला. काही वेळात तिच्या मोबाईल व्हॉट्सॲप क्यूआर कोड आला. त्याद्वारे महिलेने ऑनलाईन पैसे पाठवले. मात्र पैसे मिळाले नाही, असे सांगून भामट्याने ९ वेळा कोड स्कॅन करण्यास महिलेला भाग पाडले. या एकूणच फसवणूककांडात महिलेने ९८ हजार ५०० रुपये गमावले.

Back to top button