एफडी मोडायची मुंबई महापालिकेला गरज का भासली? : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

एफडी मोडायची मुंबई महापालिकेला गरज का भासली? : खा. सुप्रिया सुळे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण झाल्यानंतर शनिवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात आलेल्या खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सतत सांगण्यात येते की, विकासासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाही. मात्र, जर केंद्राकडे एवढा पैसा आहे, तर मुंबईत महापालिकेला त्यांच्या एफडी का मोडाव्या लागल्या, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. अशाप्रकारे एफडी मोडणे ही चिंताजनक बाब असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवारी ठाण्यात एका मॉलमध्ये बचत गटाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी खा. सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र यांचे सरकार. हे आपण प्रेमाने आदराने म्हणतो. मध्यंतरी, या सरकारला ईडी सरकार हे देवेंद्र फडणवी यांनीच संबोधले असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीबाबत विचारले असता आघाडीबाबत चर्चा होईलच तसेच वरिष्ठ नेतेमंडळी बसून त्याच्यावर निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

देशाचे पंतप्रधान एकदा निवडून आल्यावर ते पक्षाचे नाही, तर देशाचे , प्रधानमंत्री होतात, अशी आठवण त्यांनी यावेळी करून देताना, देशाचे पंतप्रधान जर मुंबईत येऊन मुंबईसाठी काहीतरी करणार असतील, तर त्याचे मनापासून स्वागत झालेच पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांचा मानसन्मान हा आम्ही आणि आपण सर्वांनी केलाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तसेच अघोरी विद्येचा मी जाहीर निषेध करते, महिलांचा मानसन्मान झाला पाहिजे. श्रद्धाही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धेविरोधात आमचा लढा सातत्याने चालू राहील. ही दाभोळकरांना श्रद्धांजली आणि आदरांजली राहील, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

Back to top button