ठाणे : मयत महिलेच्या नावे बनावट महिला उभी करून लाटले 58 लाख रुपये | पुढारी

ठाणे : मयत महिलेच्या नावे बनावट महिला उभी करून लाटले 58 लाख रुपये

भवंडी; संजय भोईर :  मुंबई-वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बाधित होणार्‍या शेतकर्‍यांच्या जागी बनावट शेतकरी उभे करून सुमारे 12 कोटी रुपये लाटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एका वयोवृद्ध मयत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला
बनावट महिला उपविभागीय अधिकारी कार्यालयात उभी करून तब्बल 58 लाखांचा मलिदा लाटण्याचा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे बाधित आदिवासी महिला ही 2011 मध्येच मयत असून तिच्या जागी ज्या आदिवासी महिलेला पैसे घेण्यासाठी उभं केलं होतं, तिच्या नावे भिवंडी उपविभागीय कार्यालयाने सुमारे 32 लाख रुपये परत
करण्याची नोटीस बजावल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे, हे विशेष.

मुंबई-वडोदरा महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात असून यामध्ये शेतकर्‍यांच्या भूसंपादित शेतजमिनीस बाजारभावापेक्षा पाचपटीने दर देण्यात आल्याने कोट्यवधी रुपये काही बाधित शेतकर्‍यांना मिळाले आहेत. या संधीचा फायदा घेत काही भूमाफिया शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी संगनमताने या पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाच पद्धतीने नांदीठणे येथील मूळ जमीनमालक नारायण भोईर यांच्या जमिनीचा मोबदला बनावट लाभार्थी उभे करून तब्बल 11 कोटी 66 लाख रुपयांवर डल्ला मारल्याची घटना
27 एप्रिल रोजी उघडकीस आली होती. त्यानंतर भूसंपदानातील अनेक व्यवहारांबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यानंतर हा नवा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भिवंडी तालुक्यातील दुगाड येथील मयत ठकी सख्या सवर या महिलेची मौजे दुगाड येथील शेतजमीन सर्व्हे क्रमांक 120/3 व 5 व 120/3 अ असे मिळून एकूण 3000 चौरस मीटर क्षेत्र बाधित होत असल्याचे शासकीय कागदपत्रांवरून सिद्ध झाले. परंतु ठकी सवर ही आदिवासी वृद्ध महिला 20 एप्रिल 2011 मध्येच मयत झालेली दुगाड ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. असे असतानाही काही भूमाफियांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात 2 मे 2018 रोजी या मयत महिलेच्या जागी भागीरथी मुकणे या वृद्ध महिलेस उभे करून तीच ठकी सवर असल्याचे भासवून मोबदला मिळणे कामी प्रकरण सादर केले.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने 6 ऑगष्ट 2021 रोजी प्रकरण मंजूर करून ठकी सवर हिच्या नावे प्रत्येकी दोन्ही प्लॉट मिळून 64 लाख 92 हजार 218 रुपये मंजूर करून त्यापैकी 10 टक्के रक्कम कपात करून मयत ठकी सवर हिच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट बँक खात्यात 58 लाख 42 हजार 996 जमा करण्यात आले. या प्रकरणात भूमाफियांनी मयत ठकी या महिलेच्या जागी गावातील भागीरथी मुकणे या वयोवृद्ध महिलेस
प्रांत कार्यालयात उभे करून ठकीच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यात आले तर भागीरथी या महिलेच्या फोटोचा वापर करून प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे बनवली.

जादा पैसे अदा केल्याने बिंग आले उघडकीस

या जमिनीचा मोबदला दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या तपासणीत सदर सर्व्हे क्रमांक 120/3 व 5 हा दुबार नोंदविला गेला असल्याने रद्द करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी 29 ऑगष्ट 2022 रोजी मयत ठकी सवर हिच्या नावे नोटीस बजावून दिले गेलेले 32 लाख 46 हजार 109 रुपये शासनास परत करण्याबाबत नोटीस बजावली.

सदरची नोटीस भागीरथी मुकणे हिचा नातू किरण सुनील मुकणे या नातवाच्या हाती पडली. आपली जमीन नसून आपण पैसे घेतलेले नसताना आपल्याला नोटीस का म्हणून भयभीत झालेल्या किरणने गावातील श्रमजीवी संघटनेचे कातकरी घटक जिल्हाप्रमुख जयेंद्र गावित यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठपुरावा घेतला असता हा बनाव उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शासकीय यंत्रणेतील भोंगळपणा पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकरणी विशेष म्हणजे मौजे दुगाड येथील तलाठी यांनी सुद्धा हे प्रकरण पूर्णत्वास जात असताना आवश्यक असलेला खातेदाराच्या नावे महसूल वसुली बाकी नसल्याचा दाखला दिला आहे. ज्या भागीरथी मुकणे या वृद्ध महिलेस ठकी म्हणून उभे करणार्‍यांनी या लाखो रुपये हडप करणार्‍यांनी तिच्या आयुष्यातील दारिद्रयाचा अंधार तसाच कायम असून ती आपल्या चंद्रमौळी झोपडीबाहेर आपल्या गरिबीतील जिणे जगत आहे.

Back to top button