ठाणे : शिंदे-भाजप-मनसे महायुतीवरून अस्वस्थता | पुढारी

ठाणे : शिंदे-भाजप-मनसे महायुतीवरून अस्वस्थता

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्ता समीकरणे सतत बदलत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतील मनसेच्या दीपोत्सवाला एकत्र आल्याने पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत महायुतीच्या चर्चेचा राजकीय फटका फुटला आहे. त्यात राजकारणात काहीही अशक्य नसते असे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य आल्याने चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे पक्षाची ताकद वाढण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सुरु केल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्यातील सत्ता बदलानंतर मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. भाजपसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याची तयारी शिंदे गटाने सुरु केली आहे. तर भाजपने मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणुका लढविण्याची रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. उत्तर भारतीयांविरोधातील मनसेची प्रतिमा बदलल्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली विनंती भाजप नेतुत्वाने मान्य केली. त्यानंतर मनसेच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सवामध्ये मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे तीन नेते एकत्र आले. त्यातून राज्यात महायुतीच्या चर्चेचे फटाके फुटले आणि त्यांचा आवाज राज्यभरात वेगवेगळ्या अर्थाने ऐकला येत आहे. दिवाळीतील या राजकीय फटाक्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून आली. ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथे बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे वर्चस्व असून मनसे नावापुरती आहे. अशा वेळी भाजपाला महापालिकांवर पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी शिंदे गट अडथळा असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. कारण शिंदे गटाचे नगरसेवक अधिक असल्याने त्या ठिकाणी भाजपाला संधी मिळणार नाही. शिवसेना फुटल्याने कल्याणची सुभेदारी मिळविण्याची नामी संधी चालून आलेली असताना महायुती कशाला हवी, असा प्रश्नही तेथील स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांना पडला आहे.

मनसेला जागा दिल्या तर भाजप वाढणार कधी

ठाण्यात मनसे नावाला देखील नसून त्यांनाही काही जागा सोडाव्या लागल्या तर भाजप कधी वाढणार, या राजकीय गणितांमधून भाजप नेत्यांनी स्वबळाची तयारी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला शिंदे गटाचा फारसा फायदा झाला नाही, उलट नुकसान झालेले दिसून येते. विभाजन होऊन देखील शिंदे गटाने चांगली कामगिरी केलेली दिसून येते. भाजपाची ताकद वाढवायची असेल तर स्वबळावर निवडणूक लढविणे आपल्या पथ्यावर असल्याच्या निष्कर्षावर भाजपचे नेतेमंडळी आल्याने ठाणे जिल्ह्यात भाजप, मनसे आणि शिंदे गट यांच्यांतील महायुती विरोधाची धार कायम आहे. त्याचवेळी शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेल्याने धास्तावलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना भाजपसोबत युती हवी, असल्याची चर्चा रंगली आहे.

Back to top button