डोंबिवली : बनावट आधारकार्डद्वारे नामांकित कुरिअर कंपन्यांची फसवणूक | पुढारी

डोंबिवली : बनावट आधारकार्डद्वारे नामांकित कुरिअर कंपन्यांची फसवणूक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  गुगलच्या माध्यमातून नागरिकांचे आधारकार्ड लॅपटॉपवर स्थापित करुन त्या माध्यमातून बनावट आधारकार्ड तयार करायचे. या बनावट आधारकार्डच्या साह्याने सीम कार्डस् खरेदी करायचे. ऑनलाईन सेवा देणार्‍या कुरिअर कंपन्यांकडून मोबाईल मागवून त्या मोबाईलमध्ये सीम कार्ड टाकायची. ऑनलाईन कंपन्यांकडून मागविलेल्या खोक्यामधील आवश्यक
असलेल्या मौल्यवान वस्तू काढून घेऊन त्यात बनावट वस्तू भरून पुन्हा त्या नामांकित कुरिअर कंपन्यांना पाठवून द्यायची, अशा प्रकारे या कंपन्यांची फसवणूक करणार्‍या 5 जणांच्या टोळीला मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 61 हजार 600 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

रॉबिन न्टनी आरुजा (28, बेरोजगार, रा. रिव्हरवुड पार्क, कासारिओ, लोढा, डोंबिवली-पूर्व), किरण अमृत बनसोड (26, बेरोजगार, रा. स्वप्नसुंदर रेसिडेन्सी, गणेश चौक, मलंग गड रोड), रॉकी दिनेशकुमार कर्ण (22, नोकरी, रा. उपासना सोसायटी, राजाराम पाटील नगर, आडिवलीढोकळी, पिसवली), नवीनसिंग राजकुमार सिंग (22, नोकरी, रा. सदगुरु प्लाझा, मलंग गड रोड) आणि अलोक गुल्लू यादव (20, सीमकार्ड विक्रेता, रा. जयमातादी चाळ, दिवा-शिळ रोड, दिवा) अशी आरोपींची नावे आहेत.

मानपाडा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना माहिती मिळाली की, कल्याण पूर्वेतील मलंगगड रोडला असलेल्या काकाचा ढाब्याजवळील स्वप्नसुंदरी रेसिडेन्सीमध्ये एक टोळी बनावटआधारकार्ड तयार करून त्याआधारे ते मोबाईलचे सीमकार्ड खरेदी करते. सदर सीमकार्डच्या आधारे ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपन्यांकडून मोबाईल मागविते. या खोक्यातील मोबाईल काढून घेतले जातात. त्या खोक्यात नकली मोबाईलचे साहित्य टाकून तो खोका पूर्ववत बंद करून पुन्हा ते दोन्ही कंपन्यांना परत पाठवून कंपन्यांची फसवणूक केली जाते. त्यानंतर खोक्यातला नवीन कोरा मोबाईल ग्राहक शोधून त्याला ही टोळी विकते. पोलिसांचे तपास पथक शुक्रवारी संध्याकाळी या टोळीचे वास्तव्य असलेल्या इमारतीमधील खोलीत गेले. या इमारतीत राहण्याचा आणि येथे काय करता ? असे विचारताच टोळके भयभीत झाले. त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी कस्सून चौकशीला सुरुवात करताच टोळीचा म्होरक्या रॉबीन आरुजा याने धक्कादायक माहिती दिली. गुगलवरून नागरिकांची आधारकार्ड स्थापित करुन घेतो. फोटो एडिटरच्या साह्याने त्याजागी मित्रांची छायाचित्रे लावतो. अशा प्रकारे बनावट आधारकार्ड तयार करुन त्याआधारे सीमकार्ड खरेदी, ऑनलाईन सेवा देणार्‍या कंपन्यांकडून मोबाईल खरेदी करत असल्याची कबुली या टोळक्याने दिली. या टोळीविरुद्ध हवालदार संतोष वायकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील तारमळे अधिक तपास करत आहेत.

Back to top button