ठाणे : कल्याणात कौटुंबिक हिंसाचाराच्या 2 घटना | पुढारी

ठाणे : कल्याणात कौटुंबिक हिंसाचाराच्या 2 घटना

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कौटुंबिक हिंसाचाराच्या लागोपाठ दोन घटना कल्याणच्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहाड स्टेशन परिसरात हनुमान मंदिराजवळच्या पाटील निवासमध्ये राहणारे जयेंद्र दिनकर पाटील (36) यांनी तक्रार दाखल केली आहे. तर शमिका जयेंद्र पाटील (27) असे मारहाण करणार्‍या आरोपी पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, पोलिस पाटील जयेंद्र पाटील हे रविवारी रात्री  मोबाईलमधल्या बातम्या पाहत बसले होते. इतक्यात जयेंद्र यांची पत्नी शमिका त्यांच्याजवळ मोबाईल देण्याची मागणी करू लागली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. शमिकाने मोबाईलची मोडतोड करत पुजेसाठी लागणारा लाकडी पाट उचलून तो जयेंद्र यांच्या डोक्यात हाणला. या हल्ल्यात जयेंद्र यांच्या डोक्यात दुखापत झाली आहे. जखमी जयेंद्र पाटील यांनी पत्नी शमिकाच्या विरुध्द खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दुसरी घटना कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात आधारवाडी रोडला असलेल्या मयुरेश्वर बिल्डींगमध्ये राहणार्‍या सरोजिनी नारायण घरटे (46) यांच्या बाबतीत घडली. शनिवारी रात्री 9.40 च्या सुमारास पती नारायण उत्तम घरटे (55) याने सरोजिनी यांच्याकडे दारू पिण्यासाठी व जुगार खेळण्यासाठी पैसे मागितले. मात्र सरोजिनी यांनी पैसे देण्यास इन्कार केला. नारायण याने शिवीगाळ करत मारहाण तर केलीच, शिवाय किचनमधील चाकू आणून सरोजिनी यांच्या डाव्या कुशीत पोटावर आणि छातीवर वार करून जखमी केले. यात त्या गंभिर स्वरूपात जखमी आहेत.

Back to top button