डोंबिवली : दहशत पसरवणार्‍या कुख्यात गुंडाला ठोकल्या बेड्या | पुढारी

डोंबिवली : दहशत पसरवणार्‍या कुख्यात गुंडाला ठोकल्या बेड्या

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा एकीकडे सत्तासंघर्षासाठी राजकारण्यांच्या सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईदरम्यान कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठीही पोलिसांनी कंबर कसली आहे. अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी तडीपारीच्या आदेशांचा भंग करून शहरात दाखल झालेल्या सिकंदर नुरमहंम्मद बगाड (34) या कुख्यात गुंडाला बेड्या ठोकण्यात टिळकनगर पोलिसांना यश आले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्लीसह कचोरे, पत्रीपूल, चोळेगाव पट्ट्यात दहशत निर्माण करून चोर्‍या, सशस्त्र हाणामार्‍या, दरोडे टाकणारा सराईत गुन्हेगार सिकंदर नुरमहंम्मद बगाड हा पत्रीपुलाजवळील न्यू गोविंदवाडीतल्या भारत नगरमधील 152 क्रमांकाच्या खोलीत राहतो. सन
2012 पासून 2020 पर्यंत सिकंदरवर टिळकनगर पोलीस ठाण्यात सशस्त्र दहशत, जबरी दुखापत, शस्त्राचा वापर, दरोडा, चोर्‍या, आदी प्रकारचे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत, तर कल्याणच्या बाजारपेठ आणि महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा दाखल आहे.

सिकंदरविरोधात यापूर्वी पोलिसांनी फौजदारी आणि न्यायालयीन कारवाई केली होती. जामिनावर बाहेर येऊन तो पुन्हा गुन्हे करत सुटला होता. त्याच्या या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी सिकंदरवर 5 वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. कारवाईचा बडगा उगारूनही त्याचे उपद्व्याप काही केल्या थांबत नव्हते. त्यामुळे कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिस उपायुक्तांनी काढलेल्या आदेशांनुसार 31 ऑक्टोबर 2015 रोजी 1 वर्षांकरिता, 22 सप्टेंबर 2018 रोजी 14 दिवसांकरिता, तर 10 ऑक्टोबर 2020 पासून ठाणे जिल्ह्यातून 1 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते.

ठाणे जिल्ह्यात पाय ठेवण्यास सक्त मनाई असतानाही हा गुंड पोलिसांची नजर चुकवून कचोरे भागात येऊन पुन्हा गुन्हेगारी करू लागला होता. 90 फुटी रस्त्यावर पुन्हा चोर्‍या, लुटीच्या घटनांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास करताना आणि गणेशोत्सवापूर्वी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी झोपडपपट्ट्या, चाळींमध्ये छापे टाकून धरपकड मोहीम सुरू केली आहे.

ही कारवाई करताना टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांना जिल्ह्यातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार सिकंदर कचोरे भागात येऊन गुप्तपणे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे आणि वपोनि अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग पिठे, सपोनि प्रवीण बाकले, फौजदार अजिंक्य धोंडे, श्याम सोनावणे, हवादार गोरखनाथ घुगे, रामेश्वर राठोड या पथकाने शनिवारी रात्री कचोरे गावात सापळा लावला. पळून जाण्याची वा प्रतिहल्ला करण्याची कोणतीही संधी न देता सिकंदरला उचलले. हद्दपारीचा आदेश मोडल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून जिल्हा हद्दीबाहेर जाण्याचे आदेश काढले असून लवकरच त्याची रवानगी तुरुंगात होणार असल्याचे सांगण्यात आले.

आतापर्यंत कारवाया केलेल्या गुंडांची यादी कल्याण-शिळ मार्गावरील दावडी परिसरात राहणारा कुख्यात गुंड प्रदीप कुंडलिक उर्फ पद्या म्हात्रे (30), कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा रोडला असलेल्या बौद्ध विहाराजवळील जाधव चाळीत राहणारा दत्ता सुनील जाधव (27), गुरूविंदर उर्फ सनी पाजी कुंदन सिंग (37), कल्याण पश्चिमेतील वालधुनीमध्ये राहणारा फजल फरीद खान (25), कल्याण पूर्वेकडील आनंदवाडीत राहणारा अनिल उर्फ बाळा विश्वनाथ शर्मा (27), कल्याण पश्चिमेकडील जोशी बागेतल्या निलम बिल्डींगमध्ये राहणारा शाहबाज एजाज सय्यद (28), कल्याण-शिळ मार्गावरील पिसवली गावात राहणारा त्रिशांत दिलीप साळवे (24), कल्याण पूर्वेकडील कैलास नगरमधल्या गायकवाड चाळीत राहणारा आशिष प्रेमचंद पांडे (23), जोशी बागमध्ये राहणारा रोहीत अशोक गिरी (28) आणि मजहर उर्फ मज्जू फिरोज शेख (31) या 10 नामचीन गुंडांच्या याआधीच नांग्या ठेचण्यात आल्या आहेत.

यात टिळकनगर पोलिसांनी जेरबंद केलेल्या सिकंदर नुरमहंम्मद बगाड (34) या गुंडाचीनव्याने भर पडली आहे. तर गंभीर गुन्ह्यांची शिरावर मालिका असलेल्या यातील 8 गुंडांवर एमपीडीए अर्थात झोपडीदादा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button