ठाणे : रेल्वे प्रवाशांना लुटणारा अटकेत | पुढारी

ठाणे : रेल्वे प्रवाशांना लुटणारा अटकेत

ठाणे : पुढारी डेस्क रेल्वे प्रवाशांच्या नजरा चुकवून मुद्देमाल पळवणार्‍याला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 1 लाख 88 हजार 262 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा आरोपी मुंबईत लुटलेला मुद्देमाल विकून पुण्यात जाऊ न एय्याशी करत होता. शुक्रवारी आरोपी अशोक सचदेव (55) याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी दै. पुढारीला सांगितले.

ऋतुजा दर्णे (62) या 13 ऑगस्ट रोजी बोरिवली ते दादर रेल्वेने प्रवास करत होत्या. महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करताना त्यांनी बॅग रॅकवर ठेवली. दरम्यान लोकल दादर स्थानकात येताच घाईघडबडीत त्या स्थानकात उतरल्या. लोकल गेल्यानंतर 1 लाख 56 हजार 262 रुपयांची दागिने ठेवलेली बॅग गाडीत विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी पश्चिम मार्गावरील दादर ते चर्चगेट स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. त्यात संशयास्पद वाटलेल्या व्यक्तीचे स्केच तयार करून त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचा आढावा घेतला असता आरोपी कधी मुंबईत तर कधी पुण्यात असल्याचे समोर आले.

त्यानुसार उपायुक्त संदीप भाजीभाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन, वपोनि केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस. के. डोक व पोलीस पथकाने सापळा लावून आरोपी सचदेव याला पुण्यातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच दर्णे याचा सोन्याचा ऐवज व 25 हजार रुपयांचा लॅपटॉप जप्त केला असल्याचे व पोनि केदारी पवार यांनी सांगितले.

Back to top button