ठाणे : ठेकेदारामुळे शून्य कचरा अभियान बारगळले | पुढारी

ठाणे : ठेकेदारामुळे शून्य कचरा अभियान बारगळले

सापाड; योगेश गोडे :  कल्याणात शून्य कचरा अभियाना अंतर्गत सुरू केलेल्या मोहिमेला ठेकेदारामुळे बारगळले आहे. त्यामुळे
कल्याण पूर्व-पश्चिमेसह डोंबिवली शहरात कचर्‍याचे मोठमोठे ढिगारे साचल्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता शहरातील नागरिकांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शून्य कचरा मोहिमेंतर्गत दररोज कचरा उचलला जात असल्याचा दावा केडीएमसी करीत असली, तरी शहरात बहुतेक ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याचे वास्तव कल्याण पश्‍चिमेसह कल्याण पूर्वे आणि डोंबिवली परिसरात दिसत आहे. कचरा एकाच जागी साचत असल्यामुळे तो पावसामुळे कुजून त्यातून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य
कारभारामुळे कल्याणकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ठेकेदारामार्फत शून्य कचरा मोहिमेचा फज्जा उडालेला दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली सह ग्रामीण भागातही सर्वत्र रस्त्यावर कचरा पसरला असून, स्थानिक नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे हा कचरा उचलण्याचे काम ज्या ठेकेदाराचे आहे. त्याला पालिकेने बर्‍याचदा नोटीस देऊनसुद्धा तो जुमानत नसल्याचे पालिका अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोकेदुखी ठरलेली कचरा समस्या सोडवण्याकरिता महापालिकेने वेगवेगळ्या उपाययोजना राभवल्या आहेत. प्रत्येक प्रभागात कचरा विघटन प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याने कचर्‍याचे थर निर्माण होणार नाही. यासाठी उंबर्डे आणि बारावे या ठिकाणी कचरा विघटन प्रकल्प सुरू करत आधारवाडी डम्पिंग बंद केले. ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचराकुंडी हटाव मोहीम, घरपट्टीमध्ये सवलत अशा वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या आहेत. काही अंशी पालिकेच्या प्रयत्नांना यश देखील
आले, परंतु पालिकेच्या या प्रयत्नांना ठेकेदारामुळे खिळ बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकदा शहरात कचर्‍याचे ढिग साचल्याचे दिसून येत आहेत. बर्‍याच ठिकाणी कचरा गाड्या बंद अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे, तर बर्‍याच ठिकाणी पालिकेच्या जागेवर या ठेकेदाराच्या भंगार अवस्थेत कचर्‍याच्या गाड्या बंद अवस्थेत पडून आहेत. विशेष म्हणजे या कचर्‍याच्या गाड्यांमधून येणार्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार देखील जडले आहेत, तर या ठेकेदाराला बर्‍याचदा नोटिसा पाठवूनसुद्धा ठेकेदार त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेला ठेकेदारामुळेच खीळ बसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.  झोपडपट्टी तथा चाली परिसरातील कचरा चार-चार दिवस उचलला जात नाही, घरोघरी कचरा उचलण्यासाठी पालिकेची गाडी येत नसल्याचा आरोप करत स्थानिकांमधून पालिका प्रशासनाविरोधात नाराजगीचा सूर आहे.

केडीएमसीचा दावा ठरतोय फोल

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात मुख्य रस्त्यालगद कचरा उचलला गेला नसल्याने कुजलेल्या कचर्‍यातून दुर्गंधी निर्माण होऊन
स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे शून्य कचरा अंतर्गत शहरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्यामुळे
कचर्‍यातून अन्नधान्याच्या शोधासाठी जनावर कचरा अस्थव्यस्त करून टाकत असल्याने पसरलेल्या कचर्‍यामुळे शहराचे सौंदर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेला ठेकेदाराकडून हडताल फसण्यात आली आहे. शहरातील अनेक ठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढिगार शहराच्या सौंदर्याला काळिमा भासत आहेत. परिणामी शून्य कचरा संकल्पनेचा दावा करणारी महापालिका जागोजागी चाचलेल्या कचर्‍यामुळे फोल ठरत आहे.

सकाळी साडेसहा वाजेपासून कचरा उचलण्यास सुरुवात केली जाते. शहरातील कचरा वेळेवर उचलला जात आहे. कचर्‍याच्या गाड्या घरोघरी जाऊन कचरा उचलत आहेत. कचरा टाकण्यासाठी प्रत्येक प्रभागात घंटागाडी ड्रॉवर आणि मुकादम यांचे नंबर सर्वांकडे आहेत. त्यांना संपर्क करून कचरा गाडी बोलावून त्यामध्ये कचरा टाकावा.
– अतुल पाटील, घनकचरा व्यवस्थापन, उपायुक्‍त

कचर्‍यातून निर्माण होणारी दुर्गंधी उघड्यावरील खाद्यपदार्थांवर परिणाम करतात. याशिवाय कोरोना, डेंगूं, मलेरिया, निमोनिया, टायफॉईड सारख्या आजारांचाही प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे कचर्‍याची वेळच्या वेळी विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
– डॉ. धीरज पाटील.

Back to top button