ठाणे : डीपीचा शॉक लागून ट्रकचालकाचा मृत्यू  | पुढारी

ठाणे : डीपीचा शॉक लागून ट्रकचालकाचा मृत्यू 

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून एका 65 वर्षीय ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यातील रामबाग, उपवन परिसरात घडली. भाऊराव नारायण चव्हाण असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत व्यक्ती ट्रक चालक असून ते कामोठे गाव, कळंबोली रोड, नवी मुंबई येथील रहिवाशी आहे. चव्हाण मंगळवारी ट्रक घेऊन रामबाग, स्मशानभूमी रोड, उपवन, ठाणे येथे आले होते. पहाटे
6.45 वाजेच्या सुमारास अमनलाल चाळ जवळ, सत्संग भवन येथे आले. त्यावेळी ते ट्रक वळवत असताना एक दुचाकीचा अडथळा त्यांच्या ट्रकसमोर येत होता. चव्हाण ट्रक खाली उतरून ही दुचाकी बाजूला करण्यास गेले. यावेळी येथे असलेल्या महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीला त्यांचा स्पर्श झाला व शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती
मिळताच वतर्कनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पाठवला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वतर्कनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, ऐन पावसाळ्यात इलेक्ट्रिक डिपींची नियमित पडताळणी करण्यात येत नसल्यामुळे त्या मृत्यूचा सापळा बनल्या आहेत. केवळ महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हि दुर्घटना घडली आहे. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय.

Back to top button