ठाणे : गोळीबार करून तांबे भरलेला ट्रक पळवला | पुढारी

ठाणे : गोळीबार करून तांबे भरलेला ट्रक पळवला

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  भिवंडी ग्रामीणमध्ये तांबे घेऊन चाललेल्या ट्रकला अडवून तो पळविण्यासाठी ट्रकचालकावर गोळीबार करून पळून गेलेल्या तीन आरोपींना भिवंडी ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडण्यात यश मिळविले. यात अजून तीन ते चार आरोपी फरार असल्याने त्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथून ट्रक मधून 60 लाख किमतीचा साडेआठ टन तांबे घेऊन दमण येथे जाण्यासाठी 6 ऑगष्ट रोजी सायंकाळी निघाला होता.हा ट्रक खारबाव-कामण रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्या पाळतीवर असलेल्या ट्रकमधील आरोपींनी या ट्रकचा पाठलाग करीत पाये येथे आला असता आरोपी बसलेल्या ट्रकने तांबे असलेल्या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक चालक संतोष कुमार पाल याने ट्रक न थांबविल्याने आरोपींनी त्यांच्या जवळील अग्निशस्त्राने चालकाच्या पायावर दोन राऊंड फायर करीत त्यास जखमी केले. झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने स्थानिक मदतीला धावून आल्याने आरोपी ट्रक सह पसार झाले. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आगरकर व वरिष्ठ पो.निरी. दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे सहाय्यक पोलीस निरी. सचिन कुलकर्णी व पोलिस पथकातील हवालदार काळढोक, भामरे, केदार, मुकादम, विशे, भालेराव हे तपास करीत असताना घटनास्थळावरून दोन जिवंत काडतुसे व दोन पुंगळ्या आढळून आल्या.

आरोपींच्या ट्रकचा क्रमांक मिळाला होता. त्याआधारे बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत असताना आरोपींनी गुन्हा करताना वापरलेल्या ट्रकचा क्रमांक बनावट असून तो ट्रक महाड येथून चोरीस गेल्याचा व तशी नोंद महाड एमआयडीसी पोलिसांकडे असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पथकाने या ट्रकचा शोध सुरू केला असता तो मुंबई येथे उभा असल्याचे समजले.

महामार्गावर पोलीसआरोपींमध्ये थरार

पोलीस पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पण ट्रक ताब्यात न घेता ट्रकचा ताबा घेण्यासाठी कोण येतो का, यावर पोलिसांनी पाळत ठेवली.
ट्रकमध्ये चालकासह दोन व्यक्ती बसून तो घेवुन निघाले. त्यांचा पाठलाग करीत भिवंडी ग्रामीण पोलिसांनी मुंबई वाहतूक पोलिसांची मदत घेतली. मानखुर्द येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस अलदर यांनी ट्रक अडविला व त्या ठिकाणी पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी झडप टाकली. दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर तिसरा त्याठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी
झाला. या तिघा आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्यात अजुन तीन ते चार आरोपींचा समावेश असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत.

Back to top button